चिखली, देऊळगावराजा, साखरखेर्डा, लोणार, मेहकर तालुक्यांत अवकाळी पावसाने गहू, हरभरा पिकांची नासाडी; आंबासह फळपिकेही धोक्यात!
– कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश
सिंदखेडराजा/बुलढाणा (सचिन खंडारे/बाळू वानखेडे) – बुलढाणा जिल्ह्यात सर्वदूर अवकाळी पावसाने हजेरी लावली असून, चिखली तालुक्यासह देऊळगावराजा, सिंदखेडराजा, लोणार, मेहकर तालुक्यात जोरदार पाऊस झाला आहे. तर कुठे रिमझिम पाऊस कोसळत होता. या पावसाने होळी सणावर विरजन घातले असून, बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा हिरवला गेला आहे. सोंगणीला आलेल्या गहू, व हरभरा पिकाची नासाडी झाली आहे. मका व इतर पिके तसेच फळपिकेदेखील संकटात सापडली आहेत. त्यामुळे ऐन सणासुदीत शेतकरी हतबल झाला आहे. दरम्यान, याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कृषीविभागाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले.
यावर्षी पावसाळ्यातही सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. नदीनाल्यांना मोठे पूर गेले तर मोठ्या प्रमाणात शेतीही खरड़ून गेली. परतीच्या पावसानेही झोड़पून काढले. पावसामुळे खरिपातील सोयाबीनला कुठे कोंब तर कुठे भरलीच नाही. लाल्यामुळे कपाशी गेली तर मूग, उड़िद हे तर दाळीलाही झाले नाहीत. त्यातच मालाला भाव नाहीत, त्यामुळे शेतकरी आधीच त्रस्त आहेत. त्यातच आता अवकाळी पाऊसही पिच्छा सोड़ायला तयार नाही. काल ५ मार्चरोजी व आज ६ मार्चरोजी जिल्ह्यातील बुलढाणा, मेहकर, चिखली, खामगाव, जानेफळ, देऊळगाव साकरशा, सिंदखेडराजा, देऊळगावराजा, मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, साखरखेर्डा, मेरासह काही भागात जोरदार तर कुठे रिमझिम पाऊस बरसला. या पावसामुळे काढणीला आलेला गहू, हरभरा, मका, भाजीपालासह इतर पिकांची नासाडी झाली आहे. तसेच आंबा व फळबागांनाही फटका बसण्याची शक्यता आहे. मालाचे पड़लेले भाव त्यातच अवकाळी पावसाने गहू, हरभरा, मका, भाजीपाला, टोळकांदासह इतर घरात येणारी हातची पिके जातात की काय या दुहेरी संकटात शेतकरी सापड़ला आहे. बुलढाणा जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणात ढगाळ वातावरण असून, जिल्ह्यासह राज्यात ८ मार्चपर्यंत हवामान खात्याचा पावसाचा अंदाज असल्याने शेतकर्यांची धाकधूक वाढली आहे. सद्या गहू, हरभरा, मका, मोहरी असे अनेक पिके सोंगणी व काढणी सुरू आहे. या सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी, मोहाडी, रताळी, सवडत, तंदूळवाडी, सावंगीभगत, पिंपळगाव सोनारा या परिसरामध्ये हरभरा व गहू पिकांना या अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. अगोदरच अतिवृष्टीचे पैसे शेतकर्यांच्या खात्यामध्ये जमा झाले नसताना आता पुन्हा अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून तर नेत नाही ना, अशी भीती शेतकर्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आहे.
सिंदखेडराजाचे तालुका कृषी अधिकारी वसंत राठोड यांच्या माहितीप्रमाणे, सिंदखेडराजा तालुक्यामध्ये ३० हजार हेक्टर क्षेत्रावर गहू व हरभरा पिकांची पेरणी झालेली आहे. अनेक शेतकर्यांनी गहू व हरभरा यांची काढणीसुद्धा केलेली आहे. परंतु अनेक शेतकर्यांनी गहू व हरभरा पिके अजूनही काढलेली नाहीत आणि अशातच अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे मोठे नुकसान होणार असल्याने शेतकरी चिंतातुर झाला आहे. अनेक मजुरांच्या हाताला लागलेली कामे अवकाळी पावसामुळे ठप्प झाली आहेत. त्यामुळे ६ मार्च रोजी आलेल्या अवकाळी पावसामुळे कुठल्याही प्रकारचा मजूर गहू व हरभरा सोंगणीसाठी शेतात गेला नाही. दिवसभर ढगाळ वातावरण असल्यामुळे लहान मुलेसुद्धा आजारी पडण्याची शक्यता आहे. यावर्षी गहू या पिकाची आवक मोठ्या प्रमाणात कृषी उत्पन्न बाजार बाजारपेठेमध्ये सुरू आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये पडणार्या अवकाळी पावसाची सूचना देण्यासाठी कुठल्याही प्रकारची शासकीय यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे शेतकर्यांची अवहेलना होत आहे.
‘महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याची माहिती मिळत आहे. यामुळे शेतकर्यांचे नुकसान झाले आहे, काही शेतकरी हवालदिल झाले आहेत, सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती आहे, तुमचे जे नुकसान झालंय त्या सर्वांचे पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेले आहेत. नुकसान झालेल्या शेतकर्यांचे पंचनामा झाल्यानंतर सरकार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. पण मी पंचनामे करण्याचे आदेश तातडीने दिले आहेत. अधिकारी, जिल्हाधिकारी सर्व पंचनामे करुन आमच्याकडे माहिती पाठवतील.
– अब्दुल सत्तार, कृषीमंत्री
———————–