– भाविकांची हेळसांड होऊ देऊ नका – आ. श्वेताताई महाले यांच्या प्रशासनाला सूचना!
चिखली (कैलास आंधळे) – बुलढाणा जिल्ह्यातील हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या सैलानीबाबा यांची प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सैलानी येथील यात्रा आजपासून सुरू झाली आहे. या यात्रेसाठी देशभरातून लाखो भाविक दाखल झाले आहेत. या यात्रेची सुरूवात दुपारी पाच वाजता नारळांची भव्य होळी पेटवून झाली. या होळीसाठी भाविकांचे लोंढेच्या लोंढे सैलानीत दाखल झाले होते. या होळीमध्ये मोठ्या प्रमाणात नारळ, अंगावरील जुने कपडे, लिंबू, कापडी बाहुल्या ओवाळून होळीमध्ये फेकून भाविक भक्तांनी आपली सैलानीबाबांवरील श्रद्धा कायम ठेवली. कोरोनाच्या तीन वर्षानंतर पहिल्यांदाच भरत असलेल्या या यात्रेसाठी महाराष्ट्रासह इतर राज्यातील भाविकांनी एकच तोबा गर्दी केली होती. यावेळी दंगाकाबू पथकासह पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
दरम्यान, प्रसिद्ध तीर्थक्षेत्र सैलानी येथील यात्रा आजपासून सुरू झाली आहे. देशभरातून लाखो भाविक येत असतात. याठिकाणी येणारे भाविक हे देशभरातून येत असल्याने त्यांची कोणतीही हेळसांड होणार नाही, याकडे जातीने लक्ष देण्याच्या सूचना चिखलीच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या आहेत. त्यांनी स्वतः यात्रेत प्रशासनाने केलेल्या व्यवस्थेची पाहणी केली. सैलानी यात्रेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिक्चरच्या टॉकीज, रहाट पाळणे, विविध दुकाने आली आहेत. यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असल्याची शक्यता असल्याने विविध मनोरंजनाची साधनेसुद्धा जास्त प्रमाणात येणार आहे. परंतु यात्रेत आलेल्या विविध दुकानांना परवानगीच्या ससेमिर्यातून जावे लागते. यात्रेत आलेल्या रहाट पाळण्याला प्रशासनाने परवानगी दिली नव्हती. त्यामुळे सदर रहाट पाळणा चालक यांनी ही बाब आ. सौ. श्वेताताई महाले पाटील यांच्या कानावर टाकली असता, त्यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना फोन लावून तातडीने परवानगी मिळवून दिली.
गैरसोय होऊ नये म्हणून अतिरिक्त बसेस सोडा – आ. महाले
सैलानी यात्रेत येणार्या भाविकांची गर्दी बघता एस टी महामंडळाने बसेसची व्यवस्था केलेली आहे. जिल्हाभरातील राज्य परिवहन महामंडळाच्या प्रत्येक आगारातून अतिरीक्त बसेसची व्यवस्था करण्याच्या तसेच पिण्याचे पाणी आणि स्वच्छता ठेवण्याच्यादेखील सूचना आ. सौ. श्वेताताई महाले यांनी यावेळी संबधित अधिकारी यांना केल्या. यावेळी गटविकास अधिकारी सरीता पवार, नायब तहसीलदार डब्बे साहेब, रायपूर पोलीस स्टेशन सहठाणेदार बस्टेवार साहेब, सरपंच शंकर तरमळे, पंजाबराव धनवे, कैलास गाडेकर, राजेशश्वर उबरहंडे, सरपंच प्रदीप गायकवाड, संदीप उगले, माजी पंचायत समिती सदस्य अकीलभाई हाजी सलीम परवेज, रेहान संजरी, दत्ता शेवाळे, गणेश पाटील, सागर गवते, गवते पोलीस पाटिल यांची उपस्थिती होती.
————————