वीज कोसळली थेट मेंढ्यांच्या कळपावर; १६ मेंढ्या दगावल्या,४० मेंढ्या जखमी!
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – विज कडाडली की काळजाचा ठोका चुकतो! मात्र हीच वीज पडली की दुर्दैवी घटना देखील घडते. काल मध्यरात्री ३ वाजताच्या सुमारास बुलढाणा तालुक्यातील साखळी बुद्रुक येथे मेंढ्यांच्या कळपावर वीज पडून १६ मेंढ्या दगावल्या तर जवळपास ४० मेंढ्या जखमी झाल्या आहेत. यंत्रणेने पंचनामा केला असून अंदाजीत ३ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. विजय अंबादास सुसर यांच्या ७ मेंढ्या तर विजय माधव बोरा यांच्या ९ मेंढ्या मृत्युमुखी पडल्या आहे. दोघांच्याही प्रत्येकी २० मेंढ्या जखमी झाल्या आहेत.
हवामान खात्याने गारपीट व अवकाळी पावसाचा संकेत दिला आहे. हा संकेत प्रत्यक्षात उतरला असून बुलढाणा जिल्ह्यात काल रात्री अनेक ठिकाणी विजांचा कडकडाट होऊन जोरदार पाऊस पडला. यावेळी बुलढाणा तालुक्यातील साखळी बु.येथील भीमा किसन लोखंडे यांच्या गट क्रमांक २७४ मधील शेतात विजय अंबादास सुसर व विजय माधव बोरा यांच्या मेंढ्या व बकऱ्या बसलेल्या होत्या. मध्यरात्री ३ वाजेच्या सुमारास अचानक वीज कोसळल्याने १६ मेंढ्यांचा दुर्दैवी मृत्यू तर जवळपास ४० मेंढ्या जखमी झाल्या आहेत. दरम्यान आज ६ मार्चला सकाळी मंडळअधिकारी, तलाठ्यांनी घटनास्थळी जाऊन घटनेचा पंचनामा केला असून मेंढपाळांचे अंदाजीत ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती जिल्हा नैसर्गिक आपत्ती विभागाने दिली आहे.
पशुधनासह मेंढपाळांचा जीव टांगणीला!
बुलढाणा जिल्ह्यात धनगर मेंढ्या-शेळ्या घेऊन येतात व कधी पैसे घेऊन तर कधी चाऱ्यासाठी मेंढ्या शेतात बसवतात. मेंढ्यांचे खत पडले की ते शेतीला लाभदायक ठरते. धनगर समाजाप्रमाणे विदर्भात अनेक भटके पशुपालक समाज शेतात खत गोळा करण्याचे काम करत करतात. शेतात शेळ्या मेंढ्या बसवतात. मात्र अवकाळी पाऊस व गारपीठ त्यांच्या जीवावर उठली आहे. गेल्या वर्षात वीज पडून पशुधन दगावण्याच्या अनेक घटना घडल्या. यावर्षीही विज, गारपिटीमुळे पशुधनासह मेंढपाळांचा जीव टांगणीला लागला आहे.