बुलढाणा (खास प्रतिनिधी) – कृषी क्षेत्रात परिवर्तनासाठी शेतकर्यांना योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. मार्गदर्शनातून शेतीविकास साधला जातो. कृषी क्षेत्राला संजीवनी देण्यासाठी राधेशाम चांडक हे सातत्याने प्रयत्नशील असल्याचे विचार पद्मश्री पुरस्कारप्राप्त राहीबाई सोमा पोपेरे यांनी व्यक्त केले.त्या डोंगरखंडाळा येथे आयोजित शेतकरी मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होत्या.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बनचे सर्वोसर्वा राधेशाम चांडक, हवामान तज्ञ पंजाबराव डख हे उपस्थित होते. बुलढाणा जिल्ह्यात हवामानावर आधारित शेती करण्याचे तंत्र व पारंपारिक बियाणांच्या वाणाच्या संरक्षक संवर्धक विषयावर मार्गदर्शन मिळावे, यासाठी राधेश्याम चांडक यांनी विशेष कार्यक्रमाचे आयोजन डोंगर खंडाळा येथे केले. सदर कार्यक्रमात राहीबाईंनी शेतकर्यांना पारंपारिक शेती तंत्रज्ञान बियाणेचे वाण आदी विषयावर मार्गदर्शन केले.
वनऔषधीचे महत्व ओळखा- राधेश्याम चांडक
जंगली औषधी अथवा वन औषधी यांना आज बाजार पेठेत मोठया प्रमाणात मागणी आहे, ही बाब अनेकांना माहित नाही. मेळघाटात उपलब्ध असलेले तिघाडीचे तेल हे आपणाला केवळ मेहंदी लावण्याआधी व नंतर वापरत असल्याची माहिती आहे. मात्र हे तिघाडीचे तेल अंतराष्ट्रीय पातळीवर औषधी, अत्तर आदीसाठी मोठया प्रमाणात वापरले जाते.तसेच आपण जो चहात वापरतो ते गवती चहा, याची मागणी मोठया प्रमाणात आहे.गवती चहाचे तेल निघते व हे आरोग्यासाठी खुप गुणकारी आहे हे अनेकांना माहित नाही. या बाबत आम्ही केंद्र सरकारशी बोललो आहो, ते म्हणाले की, आम्ही जेव्हा तुम्हाला सांगू की वन औषधी लावा, त्यावेळी आम्ही तुमच्याशी अॅग्रीमेंट करु व तुमच्याकडून ती खरेदी करु, असे आश्वासन दिल्याचे सांगितले. पुढे वन औषधीची माहिती देतांना भाईजीम्हणाले की,या वनस्पतीनाअधिक पाणी लागत नाही, किंवा मशागतीची आवश्यकता पडत नाही. कमी खर्चात जास्त उत्पन्न देणारे हे वनऔषधी आहेत. याबाबत लवकरच शास्त्रज्ञांशी चर्चा करुन विदर्भात मोठी कार्यशाळा घेत असल्याची माहिती त्यांनी दिली.
पावसाला घाबरू नका – पंजाबराव डख
जिल्ह्यात परत १३ ते १५ च्या दरम्यान पावसाची शक्यता आहे. कितीही संकटे आली तरी जगात दोन कंपन्या सुरुच राहणार आहे. यात एक औषधीची कंपनी व दुसरी शेती ही कंपनी, त्यामुळेच शेती करणा-यांना मी राजा म्हणतो. मात्र या राज्याच व पर्यावरणाच गणित जमत नसल्याचे दिसून येत आहे. शेतकर्याने पावसाला घाबरायच नसते. मी सोबत असल्यावर तर विषय नाही, मी तुम्हाला पावसाचा अंदाज सांगत जाईल त्या पध्दतीने तुम्ही कामे करा, असे जाहिर आश्वासनदेखील डख यांनी शेतक-यांना दिले.