आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिर, नरसिंह सरस्वती स्वामी महाराज मठ , ग्रामदेवता श्री भैरवनाथ महाराज मंदिरासह शहरातील विविध मंदिर आणि घराघरांसमोर प्रथा परंपरांचे पालन करीत सोमवारी ( दि. ६ ) धार्मिक मंगलमय वातावरणात होलीकोत्सव हरिनाम गजरात साजरा करण्यात आला. आळंदी परिसरात धुलवड दिनी मंगळवारी ( दि. ७ ) पाणी वाचवा संदेश देत धुलिवंदन साजरी होत आहे.
अमोल गांधी, श्रीनिवास कुलकर्णी, पपूकाका कुलकर्णी माऊली मंदिरात नागरिक, भाविक, दर्शनार्थी यांची श्रीचे दर्शनासह होळी पूजन करण्यास मोठी गर्दी केली होती. यात महिला आणि मुलांची गर्दी लक्षणीय होती. यावर्षी होळी पूजन दिन सोमवारी आल्याने प्रथम नित्यनैमित्तिक श्रींचे धार्मिक कार्यक्रम माऊली मंदिरात झाले. होळी निमित्त अजानवृक्ष प्रांगणात प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांचे हस्ते होळी पूजन वेदमंत्र, हरिनामजय घोषात पूजन करण्यात आले. मंदिरातील प्रथांचे पालन करीत हरीनाम गजरात मंदिरात होळी पूजन झाले. यावेळी व्यवस्थापक माऊली वीर, श्रीधर सरनाईक, मालक बाळासाहेब आरफळकर, राजाभाऊ चोपदार, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे, अनिल कुऱ्हाडे, योगेश सुरू, माजी नगराध्यक्ष राहुल चितळकर पाटील, ज्ञानेश्वर पोंदे, अंबादास कवितके, भीमराव वाघमारे, बल्लाळेश्वर वाघमारे यांचेसह वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते. होळी पूजन वेदमंत्र, नामजयघोषात झाल्या नंतर होळी प्रज्वलीत करण्यात आली. महिला भाविक, मुले, नागरिकानी होळीस प्रदक्षिणा करीत नैवेद्य अर्पण करण्यास तसेच श्रींचे दर्शनास गर्दी केली.
माऊली मंदिरातील प्रथेप्रमाणे सेवक भीमराव वाघमारे यांच्या सनई चौघड्यांचे वादनाने मंत्र मुग्ध वातावरणात होलिकोत्सव अर्थात होळी सण संस्कृतीची जोपासना करीत आळंदीत साजरा करण्यात आला. आळंदी पंचक्रोशीसह शहरात सर्वत्र होळी सण पारंपारिक रीतीने उत्साहात साजरा करण्यात आला. होळी पूजे नंतर पुरण पोळीचा महानैवेद्याचा महाप्रसाद वाढविण्यात आला. आळंदी शहरातील नागरिक माऊली मंदिरात होळीस नारळ प्रसाद, नैवेद्य अर्पण करण्याची परंपरा यावर्षीही कायम राहिली. धुलवड दिनी पाणी वाचवा संदेश देत युवक तरुणांनी जनजागृतीचे आयोजन केले असल्याचे आळंदी जनहित फाउंडेशनचे विश्वस्त डी. डी. घुंडरे पाटील यांनी सांगितले. पाण्याचा वापर न करता विविध रंगी रंग एकमेकांना लावत धूलिवंदन साजरे करावे. यातून पाण्याची बचत करण्यासह प्रदूषण मुक्त धुळवड साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्ञानेश्वर महाराज मंदिरात श्रींचे दर्शनास गर्दी होणार असल्याने श्रीचे दर्शन व्यवस्थेचे नियोजन प्रभावी करण्यात आले होते. कमी वेळेत जास्तीत जास्त भाविकांना सुलभ दर्शन देण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी सांगितले. ग्रामदेवता भैरवनाथ महाराज मंदिरात परंपरेने होळी पूजनाचा कार्यक्रम उत्साहात आला. यावेळी श्रीक्षेत्रोपाध्ये सुरेश वाघमारे, भैय्या वाघमारे, ज्ञानेश्वर वाघमारे यांनी पौरोहित्य केले. यावेळी आळंदी ग्रामस्थ , ग्रामसेवक मयूर उगले, ज्ञानेश्वर घुंडरे आदी उपस्थित होते.