– वाहतूककोंडी रोखण्यासाठी उचलले पाऊल!
आळंदी (प्रतिनिधी) – येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे शेजारील भाजी मंडई परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याने भाजी विक्रते, शेतकरी, शेतमाल विक्रेते यांची तात्पुरती प्रशस्त जागेत व्यवस्था आळंदी नगरपरिषद प्रशासनाने केली आहे. भाजी विक्रेते, नागरिक यांनी याची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले.
आळंदी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने भाजी विक्रेते व्यापारी शेतकरी यांच्यासाठी भाजी मंडई प्रशस्त जागेत भरण्याचा निर्णय मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी जाहीर केला. आळंदी नगरपरिषद शाळा क्रमांक चार येथील मोकळ्या प्रशस्त जागेत भाजी मंडई तात्पुरत्या स्वरूपात पुढील आदेश येईपर्यंत सुरू करण्यात येत आहे. येत्या गुरुवार (दि.९) पासून दैनंदिन भाजी मंडई बाजार हा शाळा क्रमांक चारच्या जागेत स्थलांतरित केला जात आहे. या संदर्भात मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संबंधित प्रशासन आणि भाजी विक्रते यांना या संदर्भात आवाहनदेखील केले आहे.
आळंदी नगरपरिषद विकास आराखड्यात भाजी मंडईसह इतर आरक्षणे असून अद्यापपर्यंत गेल्या अनेक वर्षापासून भाजी मंडई आरक्षित जागेवर विकसित करण्यात आली नाही. येथील गैरसोय पाहता येत्या सहा महिन्याच्या कालावधीत आरक्षित जागेमध्ये कायम स्वरूपी भाजी मंडई ची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी थोडा वेळा जाणार असून सध्या तात्पुरत्या स्वरूपात शाळा नंबर चार येथील मोकळ्या जागेत भाजी मंडईची व्यवस्था करण्यात आली आहे. या नव्या प्रशस्त जागेत भाजी मंडई भरवली जाणार असून नागरिक, भाजी विक्रेते, व्यापारी, ग्राहक यांनी नवीन जागी वाहतूक शिस्तीचे पालन करून नगरपरिषद प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी केले आहे.