BULDHANACrimeVidharbha

पोलिसांनी केली दारूची होळी!

– होळी सणाला दारूचा महापूर!
– रंगाचा बेरंग कराल तर खबरदार!

बुलढाणा (प्रशांत खंडारे) – तसे तर बुलढाणा शहर किंवा जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध देशी, विदेशी आणि हातभट्टी दारूचा महापूर वाहतोच! आता तर होळीचे निमित्तच आहे. परिणामी होळीच्या पार्श्वभूमीवर दारूचा महापूर वाहणार असल्याने व यामुळे गुन्हेगारी वृत्ती रोखून शांतता प्रस्थापित करण्यासाठी बुलढाणा शहर पोलीस यंत्रणा कामाला लागली आहे. आज, ६ मार्च रोजी सकाळी डी.बी.पथकाने ५ दारू विक्रेत्याविरुद्ध धडक कारवाई करून ८८,१०० रुपयांच्या हातभट्टीदारू व साहित्याची होळी केली. दरम्यान होळी व धुलीवंदनाच्या रंगाचा बेरंग केल्यास पोलिसांनी कारवाईचा इशारा दिला आहे.

आज तर होळी आणि धुलीवंदन असल्याने जिल्ह्यात दारूचा महापूर वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दिवशी दारू पिऊन हुल्लडबाजी करणार्‍यांना पोलीस दणका देण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्वभूमीवर बुलढाणा शहर हद्दीत ६ ते ७ मार्च दरम्यान अनुचित प्रकार घडू नये,यासाठी पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांच्या मार्गदर्शनाखाली डिबी पथक वॉच ठेवून आहे. दरम्यान आज सकाळी ६ वाजता पासून शहरातील कैकाडीपुरा, भीलवाडा जुनागाव परिसरात गावठी दारू विक्री करणार्‍या विरोधात विशेष मोहीम आली. रमेश शंकर शिंदे रा. आंबेडकर नगर, बाबू पंडित जाधव रा. कैकाडीपुरा, उषा अंकुश गायकवाड रा. वार्ड नंबर १, मिनाबाई संजय पवार रा. जुनागाव, अनिता रवी पवार रा. आंबेडकर नगर (बुलढाणा) यांना ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडून ३१७ लिटर हातभट्टी दारू, ९५० लिटर मोहसडवा व साहित्य असा एकूण ८८,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या मुद्देमालाची होळी करण्यात आली. आरोपी विरुद्ध प्रभावी प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रल्हाद काटकर यांचे नेतृत्वात सपोनी अभिजीत अहिराव, सहा. फौजदार माधव पेठकर, प्रभाकर लोखंडे,रवींद्र हजारे, गजानन जाधव,सुनील मोजे, गंगेश्वर पिंपळे, सुनिता खंडारे, शिवहरी सांगळे, युवराज शिंदे,विनोद बोरे यांनी केली.
————
.. ही प्रतिबंधात्मक कामे करा!
बुलढाणा जिल्ह्यात अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढले आहे. दारूमुळे अनेक संसार उध्वस्त होत असल्याची ओरड आहे.राज्य उत्पादन शुल्क किंवा पोलिसांची कारवाई होत असली तरी हे प्रमाण कमी झालेले नाही. खरे तर नवीन पिढी व्यसनाकडे वळणार नाही, याची दक्षता घ्यायला पाहिजे,सरकारने व्यसनाच्या पदार्थीची निर्मिती, वितरण यावर नियंत्रण ठेवावे. व्यसनविरोधी कायदे अंमलात आणावेत,व्यसनी पदार्थ विक्रीतून सरकारला जो महसूल मिळतो, त्यावरील परावलंबित्व कमी करावे, आदी प्रतिबंधात्मक कामे सरकारने करावीत, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते व्यक्त करीत आहेत.
——————
धांगडधिंगा केल्यास होळी जेलात!

होळी आणि धुलीवंदनाला दारू पिऊन वाहन चालविणे आणि इतर गोष्टी करण्याचे फॅड युवक आणि काही सामान्यांमध्ये दिसून येते. दारू पिऊन अथवा धांगडधिंगा करीत वाहने चालविल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ होते. शिवाय अनेक निष्पापांचा नाहक जीव जातो. त्यामुळे होळी आणि धुळवडीला धांगडधिगा तसेच दारू पिऊन वाहन चालविणार्‍या विरोधात कारवाईसाठी शहर पोलिसांनी मोहिम उघडली आहे. त्यामुळे गैरवृत्त केल्यास किंवा काही अनुचित प्रकार घडल्यास होळी जेल मध्ये साजरी होऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!