सांगलीतील शिवसैनिकांच्या मेळाव्यात संजय राऊतांनी निवडणूक आयोगाला घातल्या शिव्या!
सांगली (संकेतराज बने) – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची निवडणूक आयोगावर बोलताना जीभ घसरली आहे. थेट निवडणूक आयोगाचा ‘बाप’ काढत राऊत यांनी ‘भोसडीच्या’ अशी शिवी दिली. तसेच, शिवसेना ही निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा संतप्त सवाल करत आपले असंसदीय शब्द जरी असले तर तो आपला संताप आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. ते सांगलीच्या शिवसैनिकांच्या मेळाव्यामध्ये बोलत होते.
शिवसेना उध्दव ठाकरे गटाचा शिवसैनिकांचा मेळावा आज सांगलीमध्ये पार पडला आहे. या मेळाव्यामध्ये बोलताना खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केली. ही टीका करताना राऊत यांनी निवडणूक आयोगाला शिव्यादेखील घातल्या आहेत. ज्यांना जनतेने आणि शिवसैनिकांनी निवडून दिलं ते आज इथेच आहेत आणि ते ५० खोके घेऊन पळून गेले आणि निवडणूक आयोग सांगतोय शिवसेना त्यांची. शिवसेना तुझ्या बापाची आहे का? भोसडीच्या. शिवसेना ही काय निवडणूक आयोगाने निर्माण केली आहे का? असा सवाल करत बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे. ५०-५५ वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आहे, असेही त्यांनी म्हंटले आहे.
दरम्यान, यावरून पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना निवडणूक आयोगाबाबत वापरण्यात आलेल्या शिवराळ भाषेबाबत विचारला असता, त्यांनी त्या शब्दांवर ठाम भूमिका घेत, मग होऊ दे ना ट्रोल, अख्खा महाराष्ट्र शिव्या घालतोय, असं स्पष्टीकरण दिले आहे. जनता आमच्यासोबत आहे. त्यात सर्वधर्मीय आणि सर्व जातीचे लोक आहेत, असेही ते म्हणाले. कसब्याच्या निकालाने जनतेची भावना स्पष्ट झाली आहे. आता चंद्रकांत पाटील कोथरुडमधून लढणार आहेत का, सध्या पुण्याची हवा बदलली आहे. त्यांनी आपली टोपी सांभाळावी, असा टोलाही राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
कसबा हा भाजपचा बालेकिल्ला होता. ३० ते ३५ वर्षे तेथील उमेदवार जिंकत होता. मात्र, तो विजय शिवसेनेमुळे होत होता. हे कालच्या निकालावरून दिसून येते. आता सांगली आणि मिरजमध्येही उद्या तेच होणार आहे. शिवगर्जना यात्रेसाठी राज्यातील जनता रस्त्यावर उतरली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय अन्याकारक आहे, हे जनताच सांगत आहे. हिंदूहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुसर्या कोणाची कशी होऊ शकते, अशी जनतेची भावना आहे. या देशाचे स्वातंत्र्य, वृत्तपत्राचे स्वातंत्र्य, यासाठी आपल्याला लढावेच लागेल. कोणतेही स्वातंत्र्य सहजासहजी मिळत नाही. मुंबईत कोणावर हल्ला झाला असेल आणि ती व्यक्ती राजकीय नेता असेल, तर पोलिसांनी आणि गृहखात्याने त्याची नोंद घ्यायला हवी. यात शिवसेनेचे नाव घेतल्याने प्रसिद्धी मिळते. त्यामुळे आमचे नाव घेण्यात येते. मात्र, आमचा पक्ष अशा छोट्या गोष्टीत लक्ष घालत नाही. भाजपचा पराभव करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांना आम्ही सोबत घेतले आहे. काही भूमिकांवर मतभेद असू शकतात. मात्र, भाजपचा पराभव करण्यासाठी मतभेद बाजूला ठेवत सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचेही तेच मत आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांना सोबत घेण्याचे आमचे प्रयत्न आहेत, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
सांगलीत शिवसेनेचे वर्चस्व असताना आम्ही हा भाग भाजपला आंदण दिला होता. जे काल कसब्यात झाले, तेच २०२४ मध्ये सांगली मिरजमध्ये घडेल, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते खासदार संजय राऊत यांनी सांगलीत व्यक्त केला. सांगली महापालिकेत भाजपच्या नगरसेवकांनी खोके घेतल्याचाही आरोप संजय राऊत यांनी केला. टक्केवारीसाठी मारामारी होत असल्याचे ते म्हणाले. मिरजेत रस्ते नसल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या नामदार खाडे यांच्या मतदारसंघातच रस्त्याची बिकट अवस्था असल्याचेही म्हणाले.
——————–