मुंबई (विशेष प्रतिनिधी) – राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने राज्य शासनाच्या नोकरभरतीच्या वयोमर्यादेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, आता नोकरभरतीच्या मर्यादेत दोन वर्षांची वाढ झाली आहे. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत वयोमर्यादा वाढीचा निर्णय लागू राहिल, असे सांगण्यात आले आहे. कोरोना संकटामुळे दोन वर्षे नोकर भरतीची जाहिरात निघाली नाही. त्यामुळे वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांना नोकर भरतीसाठी अर्ज करता येत नव्हता. या नोकर भरतीसाठी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्यांनी दोन वर्ष वाढवून देण्याची केलेली मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. सरकारने याबाबतचा आदेश काढला आहे. सरळ सेवेत भरल्या जाणार्या पदांमध्ये भरतीसाठी वयोमर्यादेत दोन वर्ष वाढवून देण्यात आले आहेत.
सरळसेवा भरतीच्या माध्यमातून नोकरभरती होत असते. यंदा स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष असल्यामुळे राज्य सरकारने ७५ हजार पदांची नोकरभरतीची घोषणा केली आहे. मात्र कोरोनात दोन वर्षे गेले होते. त्यामुळे स्पर्धा परीक्षा होऊ शकली नाही. यातून अनेक विद्यार्थ्यांची वयोमर्यादा उलटून गेली होती. महाराष्ट्र शासनाच्या उपसचिव गीता कुलकर्णी यांच्या स्वाक्षरीसहीत प्रशासनाच्यावतीने एक आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशात, ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने ७५ हजार पदभरतीची प्रक्रिया सुरु करण्याचे घोषित केले आहे. यासाठी पदभरतीवरील निर्बंध काही कालावधीसाठी शिथिल करण्यात आले आहेत. नव्या सवलतीनुसार भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. वेगवेगळ्या कारणामुळे उदाहरणार्थ कोरोना, सदोष माणगीपत्रे आणि मागणीपत्रे न पाठवण्यासारख्या कारणामुळे, पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झालेली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे अशा उमेदवारांनी परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त व्हावी म्हणून हा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने कमाल वयोमर्यादेमध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे, असे नमूद करण्यात आले आहे.
‘३१ डिसेंबर २०२३ पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्तीसंदर्भात प्रसिद्ध होणार्या सर्व जाहिरातींसाठी अर्ज करणार्या उमेदवारांसाठी दिनांक २४ एप्रिल २०१६ च्या शासन निर्णयात विहीत केलेल्या कमाल वयोमर्दायदेत (खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्षे आणि मागास प्रवर्गासाठी ४३ वर्षे) दोन वर्षे इतकी शिथिलता देण्यात आली आहे,’ असे या आदेशात म्हटले आहे. त्यानुसार, आता खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना ३८ वर्षे वयोमर्यादा होती. ती आता ४० करण्यात आली आहे. तर मागास वर्गातील ४३ ऐवजी ४५ वयोमर्यादा असेल. ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत ज्या परीक्षांची जाहिरात येईल, तोपर्यंत वयोमर्यादेतील वाढ लागू राहणार आहे.
—————-