सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – सिंदखेडराजा तालुक्यामध्ये काही ठिकाणी वाळूचा अवैध उपसा चालू असल्याची गोपनीय माहिती सिंदखेडराजाचे तहसीलदार सुनील सावंत यांना मिळाली. त्यानुसार, शिवनी टाका रोडने अवैध रेती भरून ट्रॅक्टर जात असल्याची माहिती मिळताच तहसीलदारांनी सिनेस्टाईल शासकीय वाहन न वापरता सर्वसामान्य माणसाप्रमाणे मोटरसायकलने दिनांक ३ मार्चच्या मध्यरात्री २ वाजता ट्रॅक्टरचा घटनास्थळावरच्या लोकेशनवरून पाठलाग केला व ट्रॅक्टर थांबवले असता ‘ट्रॅक्टर मधील मजूर व ट्रॅक्टर ड्रायव्हरने ट्रॅक्टर जागेवर सोडून अंधाराचा फायदा घेत पोबारा केला.
यावेळी तहसीलदार सावंत यांनी चौकशी केली असता ट्रॅक्टर नंबर एमएच २८ एजे ५२८५ असून, ट्रॅक्टरचे मालक गणेश बंडू मेहेत्रे आहेत. सदर ट्रॅक्टर दुसरा ड्रायव्हर बोलावून तहसील कार्यालयात जमा करण्यात आला आहे. तहसीलदार सुनील सावंत यांच्या या कामगिरीमुळे अवैध रेतीची उपसा करणार्यांचे धाबे दणाणले असून, जर परिसरामध्ये अवैध रेतीचा उपसा सुरू असल्यास माहिती सांगावी, सांगणाराचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल, असेही तहसीलदार सावंत यांनी सांगितले. यावेळी कारवाई करताना त्यांच्यासोबत कोतवाल आकाश माघाडे, पोलीस कर्मचारी वायाळ आदी कर्मचारी हजर होते.