– परीक्षेआधीच गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल?
– सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, राज्यभर खळबळ
बारावीच्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही, राज्य शिक्षण मंडळाचे स्पष्टीकरण
सिंदखेडराजा (तालुका प्रतिनिधी) – परीक्षेआधीच अर्धातास अगोदर इयत्ता बारावीचा गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत तीव्र नाराजी व्यक्त करत, संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर राज्य परीक्षा मंडळाच्या अमरावती बोर्डाकडून याबाबत तात्काळ दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार शिक्षण विभागाकडून सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तथापि, बाेर्डाने गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेण्यास नकार देण्यात आलेला आहे. बोर्डाकडून कॉपीमुक्त अभियान राबवले जात असताना हा प्रकार घडल्याने राज्यभरात खळबळ उडालेली आहे.
सिंदखेडराजात बारावीच्या परीक्षेआधीच गणित विषयाचा पेपर फुटला होता. सकाळी १० वाजेपासूनच हा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामुळे हा पेपर नेमका कुणी आणि कसा फोडला? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच, हा गणिताचा पेपर परीक्षेआधीच अनेक विद्यार्थ्यांकडे पोहोचल्याचा संशय आहे. सिंदखेडराजा येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला. या पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेतही चर्चा झाली. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला. या पेपरफुटी प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अमरावती विभागाचे विभागीय सचिव उल्हास नरड यांनी दिली. तर पेपरफुटीची सखोल चौकशी करणार असून, दोषींवर कारवाई करणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री केसरकरांनी दिली. नेमका किती वाजता आणि कोणत्या परिस्थितीत पेपर फुटला हे तपासून पुन्हा पेपर घेण्याबाबत निर्णय घेणार असल्याचेही केसरकरांनी सांगितले.
दरम्यान, सिंदखेडराजा पोलिस ठाण्यात शिक्षण विभागाच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविराेधात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पेपर कुठल्या केंद्रावर लीक झाता हे अद्याप स्थळ समजले नाही. पण याबाबत पोलिसात तक्रार दाखल करून पुढील तपास पोलिस करणार आहेत.
या संदर्भात अमरावती विभाग महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून या पेपर फुटीची गंभीर दखल घेण्यात आली असून, सिंदखेडराजाचे गटशिक्षण अधिकारी व बुलढाणाचे शिक्षणाधिकारी हे तातडीने घटनास्थळी रवाना झाले व त्यांनी चौकशी सुरू केली होती. तसेच अमरावती विभाग कार्यालयातील अधिकारीसुद्धा बुलढाणामध्ये रवाना झाले असून दोषीवर कारवाई होईल, अशी माहिती विभागीय सचिव उल्हास गरुड यांनी दिली तर परीक्षेमध्ये गैरप्रकार होऊ नये, यासाठी सहा भरारी पद्धत तैनात केले अशी माहिती देण्यात आली. दुसरीकडे, परीक्षा मंडळाने पुन्हा पेपर घेतला जाणार नाही, अशी माहिती पत्रक काढून दिली आहे.
त्याबाबत विद्यार्थ्यांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्या आम्ही अभ्यास करून परीक्षा देतो मात्र असा गैरप्रकार जर होत असेल तर तातडीने यावर कारवाई करावी अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली तर यावर काँग्रेस आमदार बळवंत वानखडे यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली, शिक्षण मंत्राचा वचक नाही असा आरोप त्यांनी केला.
पेपरफुटीबाबत अजित पवारांचा सवाल, राधाकृष्ण विखे पाटलांचे उत्तर
बारावीच्या गणित विषयाच्या पेपरफुटीवर विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडून सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. ‘बुलढाण्यातील सिंदखेडराजा या ठिकाणी बारावीचा पेपर फुटला. अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांचे मोठ नुकसान झाले आहे. सरकार काय करणार असा सवाल अजित पवारांनी उपस्थित केला होता. अजित पवारांच्या या प्रश्नाला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उत्तर दिले. या प्रकरणी संध्याकाळपर्यंत चौकशी करू, अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटलांनी दिली.
——————–