बुलढाण्यातील शेतकर्यांवरील लाठीमारप्रकरणी अजित पवार विधानसभेत आक्रमक!
– रविकांत तुपकरांसह शेतकर्यांवर लाठीमारचा आदेश कुणी दिला?; अजितदादांचा जळजळीत सवाल
मुंबई (प्राची कुलकर्णी) – सोयाबीन व कापसाला दरवाढ मिळावी, यासह शेतकर्यांच्या अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिलेला होता. शांततेने, अहिंसक मार्गाने सुरु असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी अमानुषपणे लाठीमार केला. आंदोलक शेतकर्यांवर लाठीमार करणार्या पोलिसांवर आणि आदेश देणार्या पोलीस अधिकार्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी करत, विरोधी पक्षनेते अजित पवार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले.
विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीकविमा रक्कम इत्यादी शेतकर्यांना मिळण्यासाठी शेतकरी संघटनेमार्फत शांततेत आंदोलने केलेले आहे. राज्यातील शेतकर्यांनपैकी जवळपास ५० टक्के शेतकरी हा सोयाबीन उत्पादक आहे. देशाच्या सोयाबीनच्या उत्पादनापैकी जवळपास ४० टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. साधारणत: सोयाबीन उत्पादनाचा प्रतीक्विंटल उत्पादन खर्च ५ हजार ७८३ रुपये आहे. सद्याचा बाजारभाव रु.५ हजार ते ५ हजार ५०० या दरम्यानच आहे. त्यामुळे सोयाबीन पिकाला दरवाढ मिळावी यासाठी त्यांचे आंदोलन होते. कापूस पिकालाही यावर्षी ८ हजार १८४ रुपये उत्पादन खर्च आलेला आहे. तर सध्याच्या कापसाचा बाजारभाव ७ हजार ५०० ते ८ हजार ५०० दरम्यानच आहे. सातत्याने सोयाबीन व कापसाच्या भावात चढउतार होत आहे. उत्पादन खर्चही निघत नाही. त्यामुळेच शेतकर्यांनसाठीचे हे आंदोलन होते.
या आंदोलनानंतर शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांना स्थानबध्द करून त्यांना तातडीने दवाखान्यात नेले नाही. त्याऐवजी त्यांचेसोबत आलेल्या शेतकर्यांवर बेछूटपणे लाठीहल्ला केला. त्यामध्ये जेष्ठ नागरीक, महिला, लहान मुले यांचा समावेश होता. तसच तिथे वार्तांकन करणार्या पत्रकार बांधवांनासुद्धा धक्काबुक्की करत मारहाण करण्यात आली. एकंदरीत लाठी हल्ला हा पूर्वनियोजित कट होता. श्री.तुपकर यांना वैद्यकीय तपासणीसाठी दवाखान्यात दाखल केल्यानंतर अनेक विद्यमान व माजी विधानसभा सदस्यांना श्री.तुपकर यांना भेटू दिले नाही. सनदशीर मार्गाने होणारी आंदोलने दडपण्याचा प्रयत्न शासनाकडून सुरु आहे. यामध्ये पोलीस अधिकार्यांना हाताशी धरून अशी कृत्ये केली जात असून, पोलीस अधिकार्यांचे मदतीने त्यांचेवर गंभीर गुन्ह्यातील कलमे लावण्यात आली आहेत. यामध्ये पोलीस अधिकारी जाणूनबुजून त्यांना त्रास देत आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस अधिकार्यांवर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. अजितदादांचा हा आक्रमक रवैय्या पाहून सरकारची चांगलीच पाचावर धारणा बसली होती.
—————–