– बुलढाणा एलसीबीची कामगिरी
बुलढाणा (प्रशांत खंडारे) – गुन्हेगार चलाख आणि गुन्हे करण्यात निष्णांत असले तरी, पोलिसांनी मनात आणले तर त्यांचा छडा लावून आरोपींची कॉलर पकडण्यास वेळ लागत नाही. म्हणूनच ‘कानून के हात लंबे होते है’ असे म्हटले जात असावे! बुलढाणा पोलिसांनीदेखील शेगाव येथील एका आव्हानात्मक घरफोडीत डझनभर गुन्हे दाखल असलेल्या ११ अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करून, ४० लाख ३१,९८१ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याने बुलढाणा पोलिसांचे हात खरेच लंबे असल्याचे दाखवून दिले आहे. या कामगिरी संदर्भात शेगावात आज जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांनी पत्रकार परिषद यासंदर्भात माहिती दिली.
नवीन वर्षात १६ जानेवारीला शेगांव शहर येथे आनंद पालडीवाल हे घरी नसताना त्यांच्या घरात आतापर्यंतची जिल्ह्यातील सर्वात मोठी घरफोडीची घटना समोर आली होती. त्यांचे आईचे डोळ्याचे ऑपरेशन असल्याने ते जालना येथील नेत्र रुग्णालय येथे गेले असता १५ ते १६ जानेवारीच्या रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपींनी घरफोडी करून, घरातून नगदी कॅश २५ लाख रुपये,६५ लाख रुपये किमतीचे सोन्याचे हिर्यांचे १४०० ते १५०० ग्रॅम वजनाचे दागीने,२.५० लाख रुपये किमतीचे चांदीचे भांडे अन्य वस्तू असा एकूण ९२,५०,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन मेल्याची फिर्याद शेगाव पोलीस ठाण्याला पालडीवाल यांनी दिली होती. पोलिसांनी कलम ४५४, ४५७, ३८० भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासामध्ये फिर्यादी यांनी दिलेल्या जबाबावरुन सदर गुन्ह्यात एकूण ५०,१६,००० रुपयांचा मुद्देमाल चोरी गेला असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या आदेशाने एलसीबी प्रमुख अशोक लांडे यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा येथील सपोनि मनिष गावंडे, विलासकुमार सानप, अमित वानखडे, पोउपनि सचिन कानडे, श्रीकांत जिंदमवार व पोलीस चमू तसेच शेगांव ठाण्यातील पोउपनि राहूल काटकाडे, नितीन इंगोले आणि पोलिसांची पथके तयार करुन आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेज, सायबर तांत्रिक विश्लेषणकामी पथक नियुक्त करण्यात आले.
————–
असे लागले आरोपी गळाला!
गुन्ह्याच्या तपासामध्ये बुलढाणा सायबर पोलीस ठाण्यातील तांत्रिक माहितीवरुन आरोपी वैभव नंदु मानवतकर वय २६ वर्षे रा. सोनाटी ता. मेहकर गळाला लागला. त्याला नाशिक येथून अटक करण्यात आली. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा विशेष पथकाने आरोपी मुंजा तुकाराम कहते वय २० वर्षे, प्रितम अमृतराव देशमुख वय २९ वर्षे रा. प्रिंपी देशमुख ता.जि. परभणी यांना परभणी जिल्ह्यातून अटक केली. आरोपींना खाक्या दाखविल्यानंतर त्यांनी गुन्ह्यातील मुख्य आरोपींचे नावे सांगितली. दरम्यान, अजिंक्य दिगंबर जगताप वय २७ वर्ष रा. पुंगळा ता. जिंतुर यास परभणी जिल्ह्यातून तर नवनाथ विठ्ठल शिंदे वय १९ वर्षे रा. गंगाखेड जि. परभणी याला चाकण जि. पुणे येथून अटक करण्यात आली. कैलास लक्ष्मण सोनार वय २४ वर्ष रा. जेलरोड, नाशिक यास नाशिक शहरातून, मयूर राजू ढगे वय २२ वर्ष, रा. निफाड यास निफाड येथून ताब्यात घेतले. सौरभ राजूु ढगे, वय २६ वर्ष रा, निफाड, सुजीत अशोक साबळे, वय २७ वर्ष रा. खडक मालेगाव ता निफाड यांना लोणावळा येथून तर प्रविण दिपक गागुर्ड वय २८ वर्ष रा. सातपूर नाशिक यास नाशिक शहरातून आणि सौ. पुजा प्रविण गागुर्डे वय २९ वर्षे रा. सातपुर नाशिक हिला नाशिक शहर येथून ताब्यात घेवून अटक करण्यात आली.सध्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सदर गुन्ह्यामधील आरोपी सराईत गुन्हेगार असून, त्यांचे विरुध्द बुलढाणा जिल्ह्यात तसेच यवतमाळ, परभणी, नाशिक, औरंगाबाद व इतर जिल्ह्यामध्ये चोरी, जबरी चोरी, खून, घरफोडी या सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.