बुलढाणा (प्रतिनिधी) – सकस गझल लेखन करण्यासह प्रभावशाली सादरीकरणातून रसिकांची उत्स्फूर्तपणे दाद घेणारे साखळी बु.( बुलढाणा) येथील युवा गझलकार विशाल मोहिते उपाख्य मनोहर यांना राज्यस्तरीय स्व लक्ष्मण जेवणे गझल अंकुर पुरस्कार 2023 नुकताच जाहीर झाला आहे.
गझलकार नितीन देशमुख यांच्या संकल्पनेतून स्व. लक्ष्मण जेवणे यांच्या स्मृती जपाव्यात या उद्देशाने गझल अंकुर हा पुरस्कार दिला जातो. 22 मार्च रोजी अमरावती जिल्ह्यातील बेलोरा ह्या नितीन देशमुखांच्या गावी मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह देऊन विशाल मोहिते यांना पुरस्कार बहाल करण्यात येणार आहे. तर गतवर्षीचा पुरस्कार गोपाल मापारी यांना प्रदान करण्यात आला होता. विशाल मोहिते यांनी पुणे, मुंबई, नाशिक नागपूरसह राज्यभरातील विविध गझल मुशायऱ्यामध्ये सादरीकरण करून रसिकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे.