चिखली (तालुका प्रतिनिधी) – एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाल्यानंतर शेळगाव आटोळसह परिसरात अवैध सावकारी करून गरीब शेतकर्याकडून पठाणी व्याज वसुली करून त्यांना छळून आत्महत्येस प्रवृत्त करणार्या अवैध सावकार अनिल दौलत तिडके, रा. शेळगाव आटोळ याच्याविरोधात अखेर अंढेरा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. शेळगाव आटोळ येथील सावकारपीडित शेतकरी सुधाकर मिसाळ (वय ५५) यांनी काल तिडकेच्या जाचास कंटाळून आत्महत्या केली होती. याप्रकरणी पीडित शेतकरीपत्नी सिंधुबाई सुधाकर मिसाळ (वय ४०) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
चिखली तालुक्यात अवैध सावकारीचे पेव फुटले असून, अनेक शेतकरी अतोनात छळ सोसत आहेत. परंतु, सावकारांच्या दबावापोटी कुणी तक्रार दाखल करण्यास पुढे येत नाहीत. शेळगाव आटोळ येथील सुधाकर श्रीराम मिसाळ यांनी अवैध सावकार अनिल तिडके याच्याकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्या पैशावर तिडके याने अव्वाच्यासव्वा व्याज लावले. व्याजासह रक्कम परत करूनही तिडके याने मिसाळ यांची सुमारे अर्धा एकर शेती हडप केली. शिवाय, पैसे वसुलीसाठी अतोनात त्रास दिला असल्याचा आरोप होत आहे. आधीच नापिकी, अतिवृष्टी यामुळे खचलेल्या सुधाकर मिसाळ यांनी तिडके याच्या अतोनात छळास कंटाळून काल (दि.२५) शेतातच विषारी द्रव्य प्राशन केले. त्यांना गंभीर अवस्थेत चिखली येथील उपजिल्हा रूग्णालयात हलवले असता, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूपूर्वी सुधाकर मिसाळ यांनी आपण अवैध सावकार अनिल तिडके याच्या छळास कंटाळून आत्महत्या केली असल्याचे पत्नी व मुलास सांगितले होते. या तिडकेला तातडीने अटक करावी, या मागणीसाठी परिसरातील शेतकरी व मिसाळ कुटुंबीयांनी उपजिल्हा रुग्णालयातच ठिय्या आंदोलन केले होते. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने अंढेरा पोलिसांत फिर्याद दाखल झाल्यानंतर कुटुंबीयांनी सुधाकर मिसाळ यांचा मृतदेह ताब्यात घेतला व शेळगाव आटोळ येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार केले.
याबाबत मृतक सुधाकर मिसाळ यांच्या पत्नी सिंधूबाई मिसाळ यांनी अंढेरा पोलिसांत अवैध सावकार अनिल तिडके याच्याविरोधात फिर्याद दाखल केल्यानंतर अंढेरा पोलिसांनी तिडकेविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा भारतीय दंडविधानाच्या ३०६ कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. तसेच, आरोपी अनिल तिडके याला अटक करण्यात आली होती. या घटनेचा पुढील तपास हा दुय्यम ठाणेदार मनोज वासाडे हे करत आहेत. आरोपी तिडके हा एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झालेला असून, त्याच्या मालमत्तेची चौकशी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. सुधाकर मिसाळ यांनी तिडके याच्याकडून व्याजाने कर्ज घेतले होते. त्यापोटी अर्धा एकर शेतजमीन रजिष्ट्री करून दिली होती. पठाणी व्याजवसुली करूनदेखील व कर्ज फेडूनदेखील तिडके याने शेतजमीन परत देण्यास नकार दिला. तसेच, अतोनात त्रासही दिला. त्यामुळे नैराश्यात गेलेल्या सुधाकर मिसाळ यांनी आत्महत्या केली होती. या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत असून, तिडके याच्या अवैध सावकारी प्रकरणाचा अंढेरा पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी मागणी पुढे आली आहे.