लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील ग्रामीण भागात पेयजलाची भीषणता अधिक आहे. त्यामुळे अनेक गावांना जलजीवन मिशनचा आधार मिळत आहे. तालुक्यातील खुरमपूर येथे विहिरीचे बांधकाम सुरू आहे. परंतु बांधकाम सुरू असलेल्या सदर जागा बदलण्यात यावी, यासाठी गावकर्यांनी लक्षवेधी आमरण उपोषण छेडले आहे.
नवीन जलकुंभ, जलवाहिनी किंवा जलस्रोतासाठी नवीन विहीर आवश्यक असते. अशा कामांना यंत्रणेने तत्काळ मंजुरी द्यावी, असे शासनाचे निर्देश आहेत. दरम्यान, खुरमपूर येथील जलजीवन मिशन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत विहिरीचे बांधकाम करून पाणीपुरवठा करण्याच्या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गावापासून दोन किलोमीटर अंतरावरील तलावाजवळ खोदकाम सुरू आहे. परंतु ही विहीर या ठिकाणी न घेता टिटवी लघुसिंचन तलावाच्या बुडीत क्षेत्रामध्ये घेण्याची मागणी सरपंच, उपसरपंच व गावकर्यांच्या वतीने जिल्हा परिषद बुलढाणा यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली. या विहिरीची जागा त्वरित बदली करण्याच्या मागणीसाठी गावकर्यांच्यावतीने ग्रामपंचायत कार्यालयासमोर २५ तारखेपासून पासून आमरण उपोषण सुरू केले आहे.
————-