अमरावती (जिल्हा प्रतिनिधी) – गेल्या सहा महिन्यांपासून विविध टप्प्यावर आंदोलने करूनसुद्धा त्याकडे साफ दुर्लक्ष करणे, शासनाच्या शिक्षण आणि शिक्षक विषयक नकारात्मक भूमिकेमुळे बारावी बोर्ड परीक्षेच्या मूल्यांकनावर बहिष्कार आंदोलन हे शासनाने आमचे वर लादलेले आंदोलन आहे, अशी ठाम भूमिका विज्युक्टाचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी मांडली आहे. शिक्षकांच्या बहिष्कारामुळे उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम रखडले असून, अमरावती बोर्डाची मराठीच्या नियमकाची सभादेखील रद्द झालेली आहे.
महासंघ व विजुक्टा यांच्या आवाहनानुसार, बारावी बोर्ड परीक्षा मूल्यमापनावरील शिक्षकाच्या बहिष्कारामुळे उत्तरपत्रिका मूल्यांकनाचे काम रखडले आहे. पुणे येथील मुख्य नियमाकाच्या कोणत्याही बैठकी झाल्या नाहीत. तसेच विभागीय शिक्षण मंडळ नियमाकाच्या बैठकी झालेल्या नाहीत. अमरावती विभागात वर्ग बारावी उत्तरपत्रिका तपासणीविना रखडल्या आहेत. शिक्षण क्षेत्रातील न्याय मागण्यांसाठी वारंवार पत्र, निवेदन देऊन कोणत्याही प्रकारे निराकरण न करणे, आपल्या मागण्यांच्या पूर्ण करण्यासाठी ५ सप्टेंबर शिक्षक दिनापासून वेगवेगळ्या टप्पा तालुका व जिल्हा स्तरावर विविध आंदोलन करण्यात आली आहेत. तसेच २२ डिसेंबरला नागपूर विधिमंडळावर संघटनेने केलेल्या आंदोलनादरम्यान सभा घेण्याची मागणी मान्य करूनसुद्धा शिक्षणमंत्र्यांनी सभा घेतली नाही. मागण्याकडे सातत्याने डोळे झाक केल्यामुळे शेवटी वर्ग बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका मूल्यांकनावर विजुक्टा व महासंघाने बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतल्याचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे यांनी सांगितले आहे. शिक्षण मंडळासमोर झालेल्या नियमाकाच्या बहिष्कार सभेमध्ये विजुक्टा प्रांताचे अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, प्रा. शिवराम बावस्कर, जिल्हाध्यक्ष प्रा. डी एस राठोड, प्रा. इक्बाल खान, प्रा. संजय कोळी, प्रा. सुभाष पारीसे, प्रा. श्रीराम पालकर, प्रा.मंगेश कांडलकर, प्रा. पवन ढवळे आदी उपस्थित होते.
बहिष्कारामुळे ५२ लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन रखडले
महासंघ व विजुक्टाच्या अवाहनानुसार, इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनावर शिक्षकांनी बहिष्कार टाकल्याने राज्यातील जवळपास ५२ लाख उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाचा प्रश्न गंभीर झाला आहे. विशेष बाब म्हणजे, आज अमरावती विभागीय शिक्षण मंडळाची मराठी विषयक नियामकांची बैठक होती. तीदेखील रद्द झाली आहे. विभागात सद्या १.५० लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देत असून, त्यातील सहा लाखापेक्षा अधिक उत्तरपत्रिका या मूल्यांकनाविना पडून आहेत. त्यामुळे यंदा बारावीचा निकाल उशीरा लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.