बुलढाणा (खास प्रतिनिधी) – क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सार्वजनिक जयंती शहर उत्सव समिती दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी करते. बुलढाणा येथील सार्वजनिक जयंती उत्सव समिती तयारीला लागली असून, बुलढाणा येथील गांधी भवनात २५ फेब्रुवारीला पार पडलेल्या एका बैठकीत क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती शहर उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी अमोल खरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सार्वजनिक जयंती उत्सव म्हणजे एक पर्वणीच असते. दरम्यान, सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे भरगच्च आयोजन करण्यात येते. यामध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम, व्याख्याने, रक्तदान शिबिरे, रोजगार मेळावे, विविध स्पर्धा घेतल्या जातात. २५ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत सार्वजनिक जयंती शहर उत्सव समिती २०२३ च्या अध्यक्षपदी अमोल खरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या बैठकीला मान्यवरांनी मार्गदर्शन केले. मावळते समिती अध्यक्ष प्रतीक दिलीपराव जाधव यांनी बैठकीला सुरुवात केली तर संचालन माजी सचिव मिलिंद वानखडे यांनी केले. यावेळी बुलढाणा शहरातील प्रत्येक वार्डातील व शहरालगत असलेल्या गावातील प्रतिष्ठित धम्मबांधवांची व ओबीसी बांधवांची उपस्थिती होती.