बुलढाणा (खास प्रतिनिधी) – संत निरंकारी मिशन एक आध्यात्मिक विचारधारा आहे. अध्यात्म, भक्ती, सत्संग असा संदेश देण्यासोबतच सामाजिक उपक्रमांत देखील निरंकारी मंडळ कायमच अग्रेसर असते. या मंडळाच्यावतीने २६ फेब्रुवारी रोजी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हे अभियान राबविण्यात आले. भक्ती आणि सत्संगाच्या माध्यमातून मन स्वच्छ करण्यासोबतच सेवेच्या माध्यमातून जल स्वच्छ करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. शहरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमी शेजारी असलेल्या संगम तलावाचा परिसर यावेळी श्रमदानाच्या माध्यमातून स्वच्छ करण्यात आला.
निरंकारी मिशनच्यावतीने बाबा हरदेवसिंह महाराज यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून आजवर वृक्षारोपण, स्वच्छता अभियान, रक्तदान शिबिर असे विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. यावर्षी माता सुदीक्षाजी महाराज यांच्या निर्देशनानुसार २६ जानेवारी रोजी ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ हा उपक्रम राबविण्यात आला. समुद्र किनारा, नदी, तलाव, जलस्त्रोतांची जागा अशा ठिकाणी स्वच्छता अभियानाचे नियोजन करण्यात आले होते. संपूर्ण भारतभरात २७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील ७३० शहरांमध्ये मिळून जवळपास एक हजार ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात आला. त्याच अनुषंगाने बुलढाणा शाखेच्या वतीनेही शहरातील शहरातील त्रिशरण चौकातील स्मशानभूमि शेजारी असलेल्या संगम तलाव परिसरात सकाळी ९ वाजता स्वच्छता करण्यात आली.
प्रारंभी सेवादलाची प्रार्थना झाली आणि त्यानंतर स्वच्छतेच्या सेवेला सुरुवात करण्यात आली. संगम तलावाचा काठ आणि परिसरातील सर्व कचरा आणि प्लॉस्टीक जमा करुन जाळण्यात आले, पाण्यातील जलपर्णी व इतर कचरा काढुन पाणी स्वच्छ करण्यात आले. निरंकारी पुरुष आणि महिला सेवादलाने श्रमदानातून आणि सेवाभावातून हे कार्य केले. यावेळी बुलढाणा शाखेचे प्रमुख हनुमान भोसले, सेवादल संचालक सुभाष राजपूत, सेवादल शिक्षक संजय शहाने यांच्या मार्गदर्शनात सेवादलाचे पुरुष आणि महिला व निरंकारी भाविक या उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सध्या सर्वत्र प्रदूषण वाढत आहे. तसेच आपल्या मनातही प्रदूषण वाढत आहे. बाह्य स्वच्छतेसोबतच अंतर्गत स्वच्छता देखील महत्वाची आहे. सेवेच्या माध्यमातून बाह्य स्वच्छता करण्यासह सत्संगाच्या माध्यमातून मनाची स्वच्छता करण्याचे काम निरंकारी मिशन करीत असल्याचे यावेळी सुभाष राजपूत यांनी सांगितले.