चिखली (प्रतिनिधी) – चिखलीकरांची तहान भागवणाऱ्या पेनटाकळी प्रकल्पात ७५ टक्के पाणी साठा असतानादेखील चिखलीकरांना आठव्या व दहाव्या दिवशी पिवळ्या पाण्याचा पुरवठा होत असल्याची ओरड आहे. परिणामी, या दूषित पाण्याच्या माध्यमातून जलजन्य आजारांमुळे पोटांचे विकार बळावत असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नगरपालिका नियमित पाणीपुरवठा करण्यास असमर्थ ठरत असल्याचे व नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याचे दिसून येत आहे.
चिखलीकर म्हणतात सत्ता कुणाची ही असो आणि कीतीही मोठ्या प्रमाणात जलसाठा असो मात्र चिखलीकरांना पाणी पुरवठा १० व्या दिवशीच होणार हे उघड सत्य आहे. मागिल काही दिवसांपूर्वी पाणी पुरवठा विभागाने आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचा प्रयत्न केला मात्र आता पाणी पुरवठा होतोय हो पिवळ्या रंगाच्या पाण्याचा, आठव्या दिवशी आणि तोही अर्धवटच. त्यामूळे विविध प्रभागात होत असलेला अर्धवट पाणी पुरवठा करणाऱ्या विभागाप्रती चिखलीकरांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. पाणी सोडणारे वॉलमॅन पाणी सोडताना भेदभाव करतात असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी चिखली नगर पालिकेच्या कुंभकर्णी पाणी पुरवठा विभागाने उन्हाळा लक्षात घेता पाणी पुरवठा करण्याचे बिनचूक नियोजन करून चिखलीकरांना व्यवस्थीत व शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी चिखलीकरांकडून होत आहे.
वॉलमनचा वाढला तोरा…
प्रभाग क्रमांक ५ मधील दलित वस्तीला पाणी देणारा वॉलमनचा तोरा वाढला असुन १० मिनिट शिल्लक पाणी पुरवठा करायचे सांगीतले तरी करीत नाही. उलट नागरिकांना उडवाउवीची उत्तरे देतात. तरी नागरिकांना त्रास देणाऱ्या वॉलमनवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.