बुलढाणा (प्रशांत खंडारे) – बक्कळ पैसा पाहून कधी नियत फिरणार याचा नेम राहिलेला नाही. कारण एका पेट्रोलपंपाच्या मॅनेजरनेच दोन दिवसाची ३,४६,००० संकलित रक्कम आणि एक दुचाकी घेऊन पोबारा केला. दरम्यान, पोलिसांनी त्याचा जिपने सिनेस्टाईल पाठलाग करून त्याच्या मुसक्या अखेर आवळल्या. मेहकर तालुक्यातील डोनगाव येथील पेट्रोल पंपावरील हे प्रकरण आहे. मेहकर पोलिसांच्या जलद कारवाईमुळे दुचाकीसह एकूण ३,७६,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मॅनेजर ज्ञानेश्वर विलास नागरिक (२६) राहणार शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा असे आरोपीचे नाव आहे.
डॉ.शेख हबीब शेख अहमद रा. इमामवाडा चौक, मेहकर यांनी याप्रकरणी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांनी म्हटले की, त्यांच्या डोणगाव येथील अतियब पेट्रोल पंपावरील मॅनेजर ज्ञानेश्वर विलास नागरिक (२६) राहणार शेलगाव देशमुख ता.मेहकर जि.बुलढाणा याने २४ व २५ फेब्रुवारी या दोन दिवसातील पेट्रोल पंपावरील एकूण किंमत ३,४६,००० रुपयांची संकलित रक्कम व पेट्रोल पंपावरील एम एच २८ बी एन ५९९८ क्रमांकाची दुचाकी चोरून मेकर येथून पळून गेला आहे. दरम्यान मेहकर पोलिसांनी कलम ३८१ भांदवीप्रमाणे गुन्हा नोंदवून जलद गतीने तपास सुरू केला. दरम्यान वरिष्ठ पोलिसांना माहिती देण्यात येऊन जिल्ह्यात नाकाबंदी करण्यात आली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी, पोलीस उपनिरीक्षक रवी मोरे, खालिद खान, राजेश उंबरकर यांनी एका जीपने सिनेस्टाईल आरोपीचा पाठलाग केला. अखेर आरोपी कडील बॅग व त्यातील रोख रक्कम आणि दुचाकीसह त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.