बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – लोणार तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलतोड सुरू असून, त्यामुळे वनसंपदेची अतोनात हानी होत आहे. या जंगलतोडीकडे वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी हे अर्थपूर्ण भूमिकेमुळे कानाडोळा करत आहे. वनसंपदेची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असताना, वन अधिकारी व कर्मचारी यांनी मूग गिळून बसल्याने हे अधिकारी व कर्मचारी वनतस्करांना पाठीशी का घालत आहेत, याबाबत शंकाकुशंका उपस्थित होत आहेत. दरम्यान, लोणार तालुक्यातील जंगलतोड थांबली नाही तर रिपब्लिकन सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सविस्तर असे, की राज्य सरकारचा वृक्षतोडीवर बंदी आदेश असतानासुद्धा लोणार तालुक्यामध्ये बेसुमार सर्रासपणे अवैधरीतीने जंगलतोड (वृक्षतोड) होताना दिसत आहे. या प्रकाराकडे संबंधित वनसंरक्षक अधिकारी डोळे झाक करताना दिसतात. ‘कुंपणच शेत खात असेल तर’ बोलायचे कोणाला आणि सांगायचे कोणाला, असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. वन संरक्षक अधिकारी ह्या अवैध जंगलतोडीकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे पर्यावरण धोक्यात येत आहे. नैसर्गिक वातावरण खराब होत आहे. हवामानात बदल होताना दिसतात, कधी कडाक्याची थंडी तर कधी कडाक्याचे ऊन तर कधी गरम वातावरण यामुळे मानवाच्या आणि पशुपक्ष्यांच्या जीविताला धोका निर्माण झालेला आहे. अतोनात वृक्षांच्या कत्तलीमुळे पृथ्वीवरील सजीव संपून जातील आणि एक दिवस पृथ्वी धोक्यात येईल, याला सर्वस्वी वनसंरक्षक अधिकारी जबाबदार असतील, वेळीच ही वृक्षतोड थांबली पाहिजे, अन्यथा लोकशाही मार्गाने लोणार तालुका रिपब्लिकन सेनेच्यावतीने तीव्र आंदोलन केल्या जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे भाई अशोक जावळे लोणार तालुका अध्यक्ष आणि भाई सुरेश मोरे जिल्हा सचिव यांनी दिलेला आहे.