बुलढाणा (प्रतिनिधी) – मोदी सरकारला सत्तेत येऊन आठ वर्षे झालेत. मोदींच्या सांगण्यानुसार दरवर्षी दोन कोटी तरुणांना नोकर्या दिल्या जाणार होत्या. मात्र आठ वर्ष झाले तरी नोकर्या मिळाल्या आहेत का? असा सवाल आमदार विद्या चव्हाण यांनी उपस्थित करून भाजप म्हणजे देश विकणारा पक्ष असल्याचा घणाघात केला.
वाढत्या महागाईच्या मुद्द्यावर सध्या राष्ट्रवादीची जनजागरण यात्रा दुसर्या टप्प्यात सुरू आहे. या यात्रेच्या निमित्ताने विद्याताई चव्हाण बुलढाणा येथे आल्या असता त्यांनी स्थानिक पत्रकार भवन येथे पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना विद्याताई म्हणाल्या, पंतप्रधान मोदी यांनी अदानाीला सर्व काही दिले. रेल्वे, एलआयसी सुद्धा दिली. मोठमोठ्या कंपन्या दिल्या. सर्व काही विकणे सुरू आहे. हे सर्व होत असताना हिंदू बांधवांना मूर्ख बनवण्याचे कामही धार्मिक मुद्यावरून सुरू आहे. गुजरातचे दोन दलाल यामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे. तरुण वर्गाला नोकर्या नाही, शेतमालाला भाव नाही, सिलेंडर चारशे रुपये करणार होता ना, कधी करणार, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात तेव्हा जनतेच्या दरबारात न्याय होतो, यासाठीच जनजागरण यात्रेचे आयोजन असल्याचे विद्याताई चव्हाण म्हणाल्या. यावेळी त्यांनी शिंदे सरकारवर सडकून टीका केली.
हक्कभंग दाखल करणार!
सिंदखेडराजा मतदारसंघात १२० कोटींच्या विकास कामांना राज्य सरकार कडून स्थगिती देण्यात आली आहे. आमदार सोडून माजी आमदार उद्घाटन करीत आहे हे संविधानिक नाही. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर राजेंद्र शिंगणे हे हक्कभंग दाखल करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष एडवोकेट नाझेर काजी यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री असताना अजितदादा पवार यांनी आमदार कुटे यांच्या १४० गाव पाणीपुरवठा योजनेसाठी भरीव निधी दिला होता व विकास कामांना प्राधान्य दिले. मात्र सध्याचे सरकार विरोधी पक्षांच्या आमदारांचा निधी थांबवत असल्याचा आरोप काझी यांनी केला. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अनुजाताई सावळे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी डी एस लहाने, जिल्हा परिषद माजी सभापती लक्ष्मीताई शेळके, शहराध्यक्ष नाजीमा खान, शंतनू पाटील, निर्मला तायडे, मनीष बोरकर, विशाल फदाट, गौरव देशमुख, आशाताई पवार, वायाळ ताई व इतरांची उपस्थिती होती.
———————-