बिबी (ऋषी दंदाले) – पुढील पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम गड-किल्ल्यांच्या माध्यमातून अनुभवता यावा, यासाठी ऐतिहासिक वास्तूंचे संवर्धन करणे गरजेचे आहे, हा संदेश शासनासह सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने आनंद महाराज भगवान धोटे व राम लहाने हे युवक शिवजयंतीच्या पर्वावर मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथून शिवनेरीपर्यंत पायी वारी करीत निघाले आहेत. त्यांनी मंगळवारी बिबी येथे धावती भेट देऊन छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास हारार्पण करून ग्रामस्थांची भेट घेतली व आपला मनोदय व्यक्त केला. त्यांच्या या कार्याने नवीन पिढीला प्रेरणा मिळाली आहे.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासात गडकिल्ल्यांची खूप महत्त्वाची भूमिका होती, हे गडकिल्ले दुर्लक्षित आहेत. राज्यातील किल्ल्यांची डागडुजी करून त्यांना पूर्ववत करणे, प्रत्येक किल्ल्यावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, किल्ल्यांवर कमीत कमी पाच व्यक्ती किल्ल्याची देखरेख करण्याकरिता अहोरात्र तैनात असावेत, प्रत्येक सणावाराला किल्ल्यांवर रोषणाई करावी, किल्ल्यांवर जेवणाची आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, या विशेष मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आनंद महाराज भगवान धोटे व राम पांडुरंग लहाने हे शिवजयंतीच्या पर्वावर १९ फेब्रुवारीला विदर्भातील डोणगाव तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा येथून छत्रपती शिवरायांचे जन्मस्थळ शिवनेरीपर्यंत पायदळ निघाले आहेत.
मंगळवारी बिबी, तालुका लोणार येथे शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी धावती भेट दिली, व बिबी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या पुढील कार्याला सदिच्छा दिल्या. यावेळी बिबी व परिसरातील उपस्थित मंडळी शिव पाटील तेजनकर, विठ्ठलभाऊ चव्हाण, रामराव चव्हाण सर, संदीप बनकर, शिवप्रसाद बनकर, दीपकभाऊ गुलमोहर, दिलीप चव्हाण, विठ्ठलभाऊ देवकर, विठ्ठल वायाळ, भास्कर खुळे, कैलास मोरे, कृष्णा पंदे, स्वप्निल बनकर, कार्तिक धाईत, सचिन रणमळे हे प्रामुख्याने उपस्थित होते.