बिबी, ता. लोणार (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती बिबी येथे उत्साहात व अनोख्या उपक्रमांनी साजरी करण्यात आली. यावर्षी इतरत्र अनाठाई खर्च न करता, डीजे न वाजवता, भक्तिमय वातावरणात टाळ मृदंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. तसेच, उत्कृष्ट खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट तसेच मान्यवरांच्याहस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. तसेच बिबी परिसरातील विद्यार्थी, तरुण मुले हे शिवाजीराजेंसारखी व्हावीत, यासाठी विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा येथील छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट यांचेकडून गौरव करण्यात आला. या खेळाडू विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, शाल श्रीफळ देऊन ५१ विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यार्थी, मुला-मुलींनी भाषणे, पोवाडे, शिवचरित्र तसेच थोर पुरुषांचे गीत गायन केले आणि रात्री ९ ते ११ या वेळेत हभप. विष्णू महाराज बादड यांचे समाज प्रबोधन करणारे शिवाजी महाराज, महापुरुषांच्या जीवन चरित्रावर कीर्तन झाले.
यावेळी गावातील तरुण मंडळींनी व्यर्थ खर्च न करता सामाजिक आणि तरुण पिढीला चांगले संस्कार मिळतील, असे कार्य करण्याचे ठरविले आहे. यावेळी मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. तसेच कार्यक्रम यशस्वीतेसाठी छत्रपती शिवाजी महाराज ट्रस्ट यांनी परिश्रम घेऊन जयंती उत्सव मोठ्या आनंदात साजरा केला. यावेळी बिबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सोनकांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवून सहकार्य केले.