बिबी (प्रतिनिधी) – भारत देशात संविधानाच्या धर्मनिरपेक्ष तत्वामुळे सर्व धर्माला श्रद्धा, उपासना, प्रचार व प्रसार स्वातंत्र्य असल्यामुळे भारत देशात असणार्या विविध धर्म, पंथ विचार प्रणाली यांचे अस्तित्व अबाधित आहे. त्यासाठी संविधान अबाधित ठेवणे व त्याचे संरक्षण करणे प्रत्येक भारतीय नागरिकांचे कर्तव्य असावे, असे मत समाजजागृति अभियान प्रवक्ते तथा संविधान प्रचारक गजेंद्र गवई यांनी चिखली तालुक्यातील पांढरदेव येथे बुद्धमूर्ति स्थापनाच्या ११ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित विशाल धम्म मेळाव्यात व्यक्त केले.
सदर धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी माजी बीडीओ जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते शिवाजीदादा गवई होते तर प्रमुख मार्गदर्शक संविधान प्रचारक राजू गवई, माजी ठाणेदार अशोकराव काकड़े, पत्रकार प्रशांत डोंगरदिवे, सरपंच संतोष खरात, निकाळजे सर, एस एस गवई यांचे सह अनेक मान्यवर धम्म विचारपीठावर उपस्थित होते. धम्म मेळाव्याच्या प्रथम सत्रात भन्ते राजज्योति, भन्ते रेवत, भिक्खु संघ यांची धम्मदेशना झाली. याप्रसंगी विचार पीठावरील सर्व मान्यवरांनी अधिष्ठान पूजन करून महामानवांच्या प्रतिमास पुष्पहार अर्पण करून घोषणा देण्यात आल्य्या. प्रवक्ते गजेंद्र गवई, राजू गवई व कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवाजीदादा गवई यांनी भारतीय संविधान, धम्म, बुद्ध विचार यावर आपले मनोगत व्यक्त केले.
या निमित्ताने शिवाजी दादा गवई, अशोकराव काकड़े , एस एस गवई, यांचे सह अनेक जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांना स्वाभिमान समाज गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच अनेक गावांच्या महिला उपासिका संघाला मातोश्री रमाई आंबेडकर आदर्श उपासिका संघ पुरस्कार २०२३ मान्यवरांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. रात्रीला प्रबोधनकार गायक संविधान मनवरे (अमरावती) व गायिका मंजूषा शिंदे (पुणे) यांचा बहारदार बुद्ध भीमगितांचा प्रबोधनात्मक जनजागृती कार्यक्रम सादर करण्यात आला. कार्यक्रमास संपूर्ण जिल्हाभरातून हजारों लोक प्रचंड संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी समस्त पांढरदेव येथील समाजबांधव, उपासिका संघ, पंचशिल युवा मंडल यांनी अथक परिश्रम घेतले.