BULDHANAVidharbha

शिवसेनेचे चिन्ह पळविले म्हणून काय झाले?

बुलढाणा (प्रतिनिधी) – गद्दारांनो, तुम्ही ज्या घरात लहानचे मोठे झाला, नावलौकिक मिळवला, त्याच घराला तुम्ही ‘खोक्यासाठी’आग लावली. गद्दारी केली. त्याचं बक्षीस तुम्हाला मिंध्या आयोगाने दिले. चिन्हाची तुम्ही हेराफेरी केली खरी पण तुम्ही शिवसैनिकांचं काय करणार आहात? तो तर आहे तिथेच आहे. इतिहासात दिल्लीश्वराचे थडगे शिवरायांच्या शिवसैनिकांनी इथे बांधले. दगलबाजाच्या कबरी शिवसैनिक इथेच बांधतील, असा घणाघात शिवसेना नेते नारायण वाणी यांनी केला.

शिवसेनेचे चिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने काल दिला. या निर्णयाबद्दल शिवसैनिकांमध्ये संतप्त भावना उमटत आहे. आज, दिनांक १८ फेब्रुवारी रोजी केळवद येथे शिव छत्रपतींच्या पुतळ्यासमोर निषेध व्यक्त करीत शिवसैनिकांचे आत्मक्लेष आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसेना चिखली तालुका किसान सेनेचे प्रमुख नारायण वाणी यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या. पुढे बोलताना ते म्हणाले, की सार्‍या जगाला माहिती आहे शिवसेना कोणाची आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली त्यांनीच वारसदेखील नेमला आहे. मात्र सत्तेसाठी व खोक्यांसाठी बेईमानी करणार्‍यांनी दगलबाजी केली. त्यांना दिल्लीच्या बादशहाने पूर्वी खोक्याचे तर आता चिन्हाचे बक्षीस दिले आहे. पण लक्षात घ्या तुम्ही जे करीत आहात त्याने शिवसैनिक पेटवून उठला आहे. तुमची कबर तोच बांधणार आहे. असे ते म्हणाले.

यावेळी गणेश येगड, अशोक मोहिते, संतोष भोलाने, शंकर राऊत,रवि आप्पा,यांच्यासह असंख्य शिवसैनिक उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापुढे आत्मक्लेश करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!