BULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

चळवळीतील कार्यकर्त्यांना तडीपार करत असतात का?

बुलढाणा (संजय निकाळजे) – सन २०१३ मध्ये बुलढाणा जिल्ह्यासह पाच जिल्ह्यांतून एक वर्षासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची जनसामान्यांच्या आंदोलनामुळे तडीपारी करण्यात आली होती. त्या दरम्यान तत्कालीन गृहमंत्री स्व. आर. आर. पाटील यांची भेट झाली आणि सर्व प्रकार आबांना समजताच आबांनी तात्काळ गृहसचिवांना फोन केला. ‘चळवळीतील कार्यकर्त्यांना तडीपार करत असतात का..?’ रविकांत तुपकरांची तडीपारी रद्द करा, असे आदेशच आबांनी दिले. यामागे चळवळीतील कार्यकर्ते जीवंत राहिले पाहिजे ही आबांची भावना होती.. अशा शब्दात महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री स्व.आर.आर.पाटील पावन स्मृतीस शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी विनम्र अभिवादन केले, आणि अकोला कारागृहातून सुटका होताच त्यांनी सरकारला निर्वाणीचा इशारा दिला. तुपकर व २४ आंदोलकांची गुरुवार, १६ फेब्रुवारी रोजी अकोला तुरुंगातून जामिनावर सुटका करण्यात आली आहे. यावेळी त्यांना आरआर आबांची आठवण झाली.

आम्ही सोयाबीन, कापसाला भाव, पीकविमा तसेच नुकसान भरपाई मागत आहोत. मात्र सरकार आम्हाला नक्षलवादी, आतंकवादी यांच्यासारखी वागणूक देत आहे. खोटे गुन्हे दाखल करून आम्हाला जेलमध्ये टाकल्या जात आहे. पण आम्ही घाबरणारे नाही. गावखेड्यातील शेतकरी आता जागा झाला आहे, येणार्‍या काळात सरकारला जागा दाखवून देईल. आता सरकार विरोधात महाराष्ट्राभर फिरणार आहोत, आता आंदोलन आरपारचे आणि सरकारच्या बुडाखाली आग लावणारे असेल, असा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शिंदे सरकारला दिला आहे. आज, १६ फेब्रुवारी रोजी अकोला कारागृहातून सुटका झाल्यावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

चार दिवस कारागृहात असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची आज २५ कार्यकर्त्यांसह जामिनावर सुटका झाली. यावेळी शेतकरी आणि कार्यकर्ते अकोला येथे मोठ्या संख्येने हजर होते. हजारो गुन्हे दाखल झाले तरी चालतील, वेळप्रसंगी फासावर गेलो तरी चालेल, मात्र रविकांत तुपकर व त्यांचे मावळे मागे हटणार नाहीत. खोट्या केसेस, गंभीर खटले दाखल करून चळवळी मोडीत काढण्याचे काम सरकार करत आहे, पण जेव्हढा दाबायचा प्रयत्न तेव्हड्या ताकदीने आम्ही लढणार आहोत. बुलढाणा येथे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
पीकविमा, अतिवृष्टीची मदत आणि सोयाबीन-कापसाला भाव मिळाला यासाठी ११ फेब्रुवारी रोजी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. सदर आंदोलन शांततेत सुरु असताना पोलिसांनी आंदोलकावर अमानुष लाठीमार करुन आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रविकांत तुपकरांसह २४ जणांना अटक करुन त्यांच्यावर भां.द.वी. ३५३, ३०९, १७१, १४७, १४८, १४९, ३३६, १०९, १८८ सह कलम ३ प्रॉपर्टी डॅमेज ?क्ट, सहकलम १३५ मु.पो.का. नुसार गुन्हे दाखल केले होते.


रविकांत तुपकरांनी मानले ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे आभार!

अकोला येथून सुटका झाल्यानंतर तुपकर हे पत्नी, आई व कार्यकर्त्यांसह शेगाव येथे आले. श्री संत गजानन महाराज मंदिरात जाऊन त्यांनी श्री संत गजानन महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. शेगाव येथून निघाल्यानंतर बुलढाण्यापर्यंत त्यांचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी बुलढाणा- चिखली रस्त्यावरील साखळी फाट्यावर त्यांचे ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्यावतीने जिल्हा विशेष प्रतिनिधी संजय निकाळजे, दैनिक देशोन्नतीचे ज्येष्ठ पत्रकार प्रताप मोरे यांनीदेखील स्वागत केले. यावेळी रविकांत तुपकर यांनी माझ्या आंदोलनात ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’सह जिल्ह्यातील पत्रकारांचा मोठा सहभाग असून, धन्यवाद व्यक्त केले. खरे तर पत्रकारांच्या लेखनीमुळे मी कोणतीही आंदोलन यशस्वी करू शकतो, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली. भविष्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकर्‍यांना न्याय देण्यासाठी प्राण गेला तरी चालेल, पण हटणार नाही, ही भूमिका घेणार असून, येत्या काळातसुद्धा सहकार्याची अपेक्षा त्यांनी ब्रेकिंग महाराष्ट्र टीमकडून व्यक्त केली.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!