ChikhaliVidharbha

ज्येष्ठ कलावंतांचा पुरस्काराने सन्मान

बुलढाणा (संजय निकाळजे) – माता जिजाऊ, सावित्री, रमाई त्यांच्या कार्यामुळेच छत्रपती, महात्मा व घटनापती घडले. माता रमाईचा त्यागदेखील बाबासाहेब व समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन माजी आमदार तथा बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी केले. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंती निमित्त जांभोरा येथे महात्मा फुले लोककला बहुद्देशीय सांस्कृतिक मंडळ यांच्या माध्यमातून ७ फेब्रुवारीरोजी लोक कलावंत सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी राहुल बोंद्रे बोलत होते.

यावेळी सर्वप्रथम भगवान बुद्ध, जिजाऊ माँसाहेब, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीमाई फुले, माता रमाई यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. तद्नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष राहुल बोंद्रे, यांचेसह शाहीर डी आर इंगळे, प्रा.रवींद्र साळवे, शिवाजी लहाने, नानाभाऊ परीहार, एस.एस.गवई, यांचे प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी एस.एस.गवई यांनी प्रास्ताविकामधून माता रमाई यांचा त्याग तसेच शाहीर कलावंत यांचे सामाजिक योगदान यांची मांडणी केली. यानंतर उपरोक्त मान्यवरांच्या हस्ते त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर ज्येष्ठ लोककलावंत पुरस्कार कवीश्वर अवचार, पांडुरंग अवसरमोल, लजपतराव गवई, भाऊराव साळवे, मोहन वानखेडे, सुभद्राबाई गवई, चंद्रभागा जाधव, चंद्रशेखर साळवे, भिकनराव घेवंदे, भारत साबळे यांना शाल,सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला. यावेळी प्रा.रवींद्र साळवे यांनी माता रमाई यांची जीवनी आणि कार्य याबद्दल माहिती देऊन शाहिरांच्या लेखणीची समीक्षा केली. ‘दुःख संसाराच केलं डोळ्यात जमा.. तुमच्यात आहे का अशी कोणती रमा’ असे शब्द सामर्थ्य लेखणीतून गळ्यातून समाजापर्यंत आदर्श मूल्ये पोहोचविण्याचे कार्य शाहिरी करत असते. तसेच काही उपरोधिक गीत आणि शब्द यांचाही त्यांनी समाचार घेतला. शाहिर कलावंतांवर विशेष जबाबदारी निश्चित करीत जाती धर्म भाषा यांच्याही पलीकडे माणुसकीचा धागा जुळविण्याविषयी त्यांनी आपले मत मांडले. शाहीर डी.आर.इंगळे यांनी यावेळी कलावंत शाहीर कलावंत यांच्या समस्यां मानधन, आरोग्य तसेच अत्यंत खडतर जीवन याबाबत आपले मत मांडले. तसेच येत्या मार्च महिन्यात राज्यस्तरीय शाहिरी मेळावा बुलडाणा येथे आयोजित करण्यात येत आहे, अशी घोषणा गेली.

अध्यक्षीय भाषणातून माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी माता रमाई यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. महिलांची होणारी प्रगती दिसत असली तरी तिची झुंज अजून संपली नाही. स्त्रीचा त्याग हा महान आहे. मा जिजाऊ, मा सावित्री, मा रमाई यांनी समान कार्य केल्यामुळेच छत्रपती, महात्मा, घटनापती देशाला मिळाले. या सर्वांचा आदर्श आपल्या कलेतून शाहिरीतून प्रतित होत असतो. शाहीर आपल्या लेखणीने समाजाला दिशा दाखवत असतो. मूक समाजाचा आवाज तसेच समाजाला जिवंत ठेवणारा शाहीर यांचा गौरव त्यांनी केला. यावेळी सद्य परिस्थिती अत्यंत वेगळी आहे समाजा-समाजा मध्ये वितुष्ट आणणारे देशाला विषमतेच्या खाईत लोटणारी परिस्थिती आहे. त्यामुळे जात धर्म पंथ भाषा विविधता जपणारा भारत जोडण्याचे कार्य कलावंत शाहीर यांचेकडे आहे असे मत त्यांनी प्रदर्शित केले. देशाचे ऐक्य शाहिरी गीतातून शक्य आहे असाच सूर यावेळी ऐकू आला.

भोजनदान झाल्यानंतर शाहीर भीवाजी पवार, भीमराव खंडारे, यशवंत शिंगारे, गजानन गवई,के के ठोंबरे, भिवाजी धुरंदर, एस के जाधव सर, प्रदीप गवई, दिलीप गवई, प्रितमकुमार मिसाळ, पत्रकार संजय निकाळजे, प्रदीप जाधव, प्रभू डोके, विलास गवार्गुर, गजानन मिसाळ, राजू हिवराळे, गोविंदराव हिवराळे, विशाल पैठणे, मयूर साळवे, सिंधू गवई, मंगलताई शींगारे, संगीताताई निकाळजे, मंदा कासारे, वंकर कासारे, मोहन खरात, सुरेश अवसरमोल, संघपाल गवई, मंदाबाई आराख, देवेंद्र आराख, वसंता आराख, पंजाबराव गवई, प्रतीक वानखडे, कांचन मलवार यांनी आपल्या गीतांचे सादरीकरण केले. कार्यक्रमासाठी पोलीस पाटील प्रदीप गोलांडे, तंटामुक्ती अध्यक्ष पंडित नेवरे, सुभाष खरात, प्रवीण वानखेडे, ग्रा. स. योगेश गोलांडे, तुकाराम मलवार आदींनी सहकार्य केले. सूत्रसंचालन दयानंद निकाळजे सर यांनी तसेच आभार प्रदर्शन रामदास मलवार यांनी केले. यावेळी जिल्हाभरातून कलावंत तथा कलारसिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!