– बुलढाण्याच्या सत्यमेव जयते बँकेने राबविला आगळा वेगळा व कौतुकस्पद उपक्रम
बुलढाणा (बाळू वानखेडे) – म्हणतात ना, गरजूंच्या मदतीसाठी धावून येणारा देवदूतापेक्षा निश्चितच कमी नसतो. अशाच विविध क्षेत्रातील देवदूतांचा अर्थात जिल्ह्यातील ग्रामीण भागात विविध क्षेत्रात प्रसंगी पदरमोड़ करून गरजूंच्या मदतीसाठी धावून येणार्या समाजसेवकांच्या पाठीवर कौतुकाची थाप देत त्यांचा सन्मान करण्यात आला. बुलढाण्याच्या सत्यमेव जयते बँकेने हा कौतुकास्पद व आगळावेगळा सोहळा ५ फेब्रुवारी रोजी आयोजित केला होता.
जिल्ह्यात सत्यमेव जयते परिवार हा समाजाला आर्थिक सक्षम करून दिशा देणारा परिवार असून मागील दहा वर्षापासून सामाजिक काम करून जिल्ह्यामध्ये अलौकिक असे नाव सत्यमेव जयते परिवाराने कमवले आहे. तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसाला आर्थिक सक्षम करण्याचे काम करीत असल्याने या परिवाराने ग्रामीण भागात गेल्या २५ वर्षापासून अपंग, मूकबधिर, कर्णबधिर, मुला मुलींचे संगोपन करणारे हिवरा आश्रम येथील पंढरीनाथ शेळके, तसेच वारकरी मंडळींना मोफत भोजन, कपडे, आदी सेवा देणारे दामूअण्णा शिंगणे शेंदुर्जन, तसेच एड्सबाधीत मुला-मुलींचे संगोपन व त्याचे पुनर्वसन, अनाथ बेघर, बेसहारा महिलांना मदत करणारे महेंद्र सौभाग्य तसेच रस्त्यावर पडलेल्या, बेघर गोरगरीब लोकांना मोफत उपचार व मदत करणारे डॉ पंढरी इंगळे तसेच महिलांना मासिक पाळीबाबत जनजागृती, गोरगरीब बेघर महिलांवर होणारे अन्याय अत्याचाराला त्रस्त असलेल्या महिलांना मदत करणार्या स्नेहल कदम आणि त्याच प्रमाणे गेली २६ वर्षापासून दैनिक देशोन्नतीमध्ये सतत जनतेच्या समस्यांना वाचा फोडणारे व त्यांना वेळोवेळी मदत करणारे मेरा बुद्रूकचे पत्रकार तथा आखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघटनेचे अध्यक्ष प्रतापराव मोरे अशा सहा ग्रामीण भागात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्या समाज सेवकांचा सन्मान सत्यमेव जयते बँकेच्यावतीने ५ फेब्रुवारी रोजी मोठ्या आनंदात करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमांमध्ये मंत्रालयातील सहसचिव विद्याधर महाले पाटील, आमदार संजय गायकवाड, डॉ. आशुतोष गुप्ता, संदीप गायकवाड, प्राध्यापक पंढरीनाथ शेळके, हभप दामूअण्णा शिंगणे, प्राध्यापक विष्णुपंत पाटील, पत्रकार राजेंद्र काळे, पत्रकार रणजितसिंह राजपूत, अरविंद शेळके, पत्रकार बोरसे पिप्री गवळी आदींची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे प्रास्तावीक व सूत्रसंचलन थिगळे यांनी केले तर आभार अरविंद शेळके यांनी मानले.