Breaking newsBULDHANAHead linesMaharashtraPolitical NewsPoliticsVidharbha

धीरज लिंगाडे म्हणतात?; ‘काँग्रेस बोगस, नाना पटोले मॅनेज्ड’!!

– पदवीधर मतदारांत तीव्र संतापाची लाट!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – विधानपरिषदेच्या अमरावती पदवीधर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे उमेदवार धीरज लिंगाडे यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, त्यात ते काँग्रेस पक्ष बोगस तर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे भाजपला मॅनेज्ड झाल्याचे बोलताना ऐकू येत आहे. या ऑडिओ क्लिपने अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकच खळबळ उडालेली असून, पदवीधर मतदारसंघात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ही क्लिप खरी की खोटी? याबाबत त्यांनी हे वृत्तलिहिपर्यंत कोणताही खुलासा केला नव्हता. तसेच, ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण त्यांच्याशी संपर्कदेखील होऊ शकला नव्हता. लिंगाडे हे महाविकास आघाडीच्यावतीने निवडणूक रिंगणात असून, त्यांची लढत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्याशी होत आहे. अमलकार हे सुसंस्कारीत, उच्चशिक्षित व पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभ्यासू असे उमेदवार या निवडणुकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिलेले आहे. प्रा. डॉ. अमलकार यांना ओबीसी, दलित, बहुजन समाजातून प्रचंड पाठिंबा मिळालेला आहे.

धीरज लिंगाडे यांची व्हायरल क्लिप महाराष्ट्र टाईम्स या प्रतिष्ठीत दैनिकाने प्रसारित केली आहे.

पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला अवघे दोन दिवस उरले असताना, काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्या वादग्रस्त वक्तव्याची ‘ऑडियो क्लीप’ व्हायरल झाली आहे. या क्लिपने चांगलीच खळबळ उडाली. उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी निवडणुकीतील अपक्ष उमेदवार शरद झांबरे यांच्याशी संवादाची ही ऑडियो क्लीप आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडी काय निर्णय घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ऑडिओमध्ये काँग्रेस संदर्भात धीरज लिंगाडे यांनी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. लिंगाडे यांनी काँग्रेस बोगस असल्याचे यात म्हटले आहे. लिंगाडे यांनी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याच्या आदल्या दिवशी ठाकरे गटातून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. काँग्रेसने आपल्या पक्षातील इच्छुकांना डावलत लिंगाडे यांना उमेदवारी दिली. डॉ. रणजीत पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मतदारसंघात कमकुवत उमेदवार देण्यासाठी मॅनेज केल्याच्या आरोपालाही लिंगाडे यांनी दुजोरा दिला. या ऑडियो क्लीपमुळे चांगलीच खळबळ उडाली. तसेच, काँग्रेसची विचारधारा मानणार्‍या पदवीधरांमध्ये संतापाची तीव्र लाट उसळली आहे.

आता या क्लिपनंतर काँग्रेसचे उमेदवार धीरज लिंगाडे यांच्यासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष किती परिश्रम घेतात आणि अपक्ष उमेदवारांची मतविभागणी कुणाच्या पथ्यावर पडणार, याचे आडाखे बांधले जात आहेत. सद्याच्या कौलानुसार, लिंगाडे व वंचित बहुजन आघाडीचे प्रा. डॉ. अनिल अमलकार यांच्यात या मतदारसंघात खरी लढत आहे. परंतु, या क्लिपमुळे वातावरण पालटल्याचे दिसून येत असून, पदवीधर सुसंस्कारीत, उच्चशिक्षित आणि पदवीधरांच्या प्रश्नांची जाण असलेल्या प्रा. डॉ. अमलकार यांना संधी देण्याच्या मानसिकतेत आलेले आहे.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!