कर्जत (प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून विद्यार्थ्यांमध्ये एकोपा जोपासावा यासाठी परीक्षा पे चर्चा अंतर्गत इयत्ता नववी ते बारावीपर्यंत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेत संधी मिळावी म्हणून कर्जत येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन केले होते. ही स्पर्धा अमरनाथ विद्यालय कर्जत येथे घेण्यात आली. यामध्ये ४९८ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या चित्रकला स्पर्धेचा निकाल घोषित करण्यात आला असून, त्यामध्ये वसंतदादा पाटील विद्यालय अंबालिकानगर येथील विद्यार्थिनी अंजली दत्तात्रय पवळ हिने प्रथम क्रमांक पटकावला तर द्वितीय क्रमांक सोनाबाई सोनमाळी कन्या विद्यालय कर्जत येथील विद्यार्थिनी कल्याणी रवींद्र भवर हिने पटकावला तर तृतीय क्रमांक नूतन विद्यालय मिरजगाव या शाळेतील भूषण प्रकाश त्रंबके या विद्यार्थ्यांने पटकवला आहे.
या चित्रकला स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी तालुक्यातील कला शिक्षकांची कमिटी स्थापन करून त्यांनी विजेत्यांची निवड केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी केले. बक्षीस वितरण भाजपाचे प्रवक्ते तथा आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष डॉ सुनील गावडे, जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सचिन पोटरे, अशोकराव खेडकर, माजी नगरसेवक अनिल गदादे, शशिकांत पाटील, निखिल पाटील, दादासाहेब सोनमाळी, गटशिक्षणाधिकारी शिवगुंडे मॅडम व तालुक्यातील सर्व शाळांचे कलाशिक्षक उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. अमरनाथ विद्यालयाने या स्पर्धेसाठी जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राचार्य व अध्यक्षांचे आभार मानण्यात आले.