Breaking newsChikhaliHead linesVidharbha
गांगलगाव येथे तरुणाचा विहिरीत मृतदेह आढळला; हत्या की आत्महत्या?
चिखली (एकनाथ माळेकर) – गांगलगाव येथील विजय डोंगरे या अवघ्या २८ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या विहिरीत तरंगताना आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विजय या शेतमजुरी करून कुटुंबीयांची उपजीविका भागवत होता. त्यामुळे ही दुर्देवी घटना आत्महत्या आहे की हत्या? असा संशय निर्माण झालेला आहे. कोलारा येथील रामभाऊ बाबांच्या यात्रेकरिता विजय हा चौघांसोबत गेला होता. त्यानंतर तो घरी परत आलाच नाही. आज त्याचा मृतदेहच आढळून आला. त्यामुळे या घटनेबाबत शंकाकुशंका वर्तविली जात असून, पोलिसांनी सर्व अंगाने कसून चौकशी करण्याची गरज आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
गांगलगाव ते चिखली रोडवरील अशोक आराख यांचे शेत असून, आज ते शेतातील विहिरीवर असलेली मोटार चालू करण्यासाठी गेले होते. त्यावेळेस त्यांना विहिरीत प्रेत तरंगताना आढळून आले. त्यांनी याबाबत तातडीने गावाचे पोलिस पाटील व सरपंच यांना माहिती दिली. या दोघांसह गावकरी तातडीने विहिरीकडे धावले असता, याबाबत पोलिसांनाही माहिती देण्यात आली. तरंगणारे प्रेत हे विजय डोंगरे (वय २८) या गांगलगाव येथील तरुणाचे असल्याचे आढळून आले. अंढेरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार गणेश हिवरकर हे लगेचच पोलिस फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंढेरा येथे नेला व नंतर नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. विजय हा शेतमजुरी करून आपली व कुटुंबीयांची उपजीविका चालवत होता. त्याला आई-वडिल, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. त्यामुळे त्याचे विहिरीत प्रेत आढळताच गावात एकच खळबळ उडाली. त्याच्या कुटुंबीयांचा आक्रोश अनेकांच्या डोळ्याच्या कडा पाणावत होता. या घटनेप्रकरणी अंढेरा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
—————————
विजय डोंगरे हा इतर तिघांसह कोलारा येथील रामभाऊ बाबांच्या यात्रेला गेला होता. तसेच, गांगलगाव येथेदेखील भंडारा असल्यामुळे गावात भरपूर वर्दळ होती. तो ज्यांच्या सोबत गेला होता, ते घरी परत आले होते. परंतु, विजय हा परत आला नव्हता. त्यामुळे विजय याचा सापडलेला मृतदेह हा आत्महत्या आहे की हत्या? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तसेच, या घटनेप्रकरणी अशोक डोंगरे यांनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, काही संशयितांची नावे पोलिसांना दिली आहेत. पोलिसांनी या संशयितांना चौकशीसाठी पोलिस ठाण्यात बोलावले होते. हे वृत्तलिहिपर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. दरम्यान, या घटनेने गांगलगावसह परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.
———————-