Breaking newsHead linesMaharashtraMumbaiPolitical NewsPoliticsWorld update

भाजप पुन्हा उद्धव ठाकरेंना ‘टाळी’ देण्याच्या तयारीत!

– वरिष्ठ स्तरावरून चर्चा सुरू असल्याची नवी दिल्लीतील खास सूत्राची पक्की माहिती!

पुरूषोत्तम सांगळे

नवी दिल्ली/मुंबई – हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या कडवट हिंदुत्ववादी शिवसेनेची दोन शकले करण्यात ज्या भारतीय जनता पक्षाचे सर्वात मोठे योगदान राहिल्याची बाब आता लपून राहिली नाही; त्या भाजप आणि उद्धव ठाकरे यांच्यात दिलजमाई आणि पुन्हा एकत्र आणण्यासाठी नवी दिल्लीत जोरदार हालचाली सुरू आहेत. एक मोठा उद्योगपती आणि भाजपचा एक वजनदार नेता यासाठी प्रयत्न करत असल्याची खात्रीशीर माहिती नवी दिल्लीतील वरिष्ठ राजकीय सूत्राने दिली आहे. उद्धव ठाकरे यांचा विरोध देवेंद्र फडणवीस यांना आहे. ‘हायकमांड’ असलेल्या भाजप नेत्यांसोबत जुळवून घेण्यास ते तयार आहेत, असा ‘मेसेज’ या अनुषंगाने नवी दिल्लीत भाजप नेतृत्वाकडे गेला असून, परवादिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत भेट देताना दोघांना संयुक्त भेट न देता, दोघांनाही एकएकटे बोलावून त्यांच्याशी चर्चा केल्याची बाबही याच ‘मेसेज’चा परिणाम असल्याचे याच राजकीय सूत्राने सांगितले.

आगामी निवडणुकांना फक्त ४०० दिवस उरले आहेत. या लोकसभा निवडणुका व नंतर येणार्‍या विधानसभा निवडणुकांचा गोपनीय रिपोर्ट भाजपच्या हायकमांडकडे गेलेला आहे. लोकसभा निवडणुकीत सलग तिसर्‍यांदा विजय प्राप्त करून इतिहास रचण्याच्या तयारीत भाजपमधील ‘टीम मोदी’ लागलेली आहे. परंतु, या ऐतिहासिक विजयाला महाराष्ट्रातून सुरूंग लागू शकतो, असा ‘रिपोर्ट’ आहे. काही प्रसारमाध्यमांनी व सर्वेक्षण संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणाचा रिपोर्टदेखील भाजपच्या विरोधात जाणारा आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोबत घेण्याच्या हालचाली भाजपने गतिमान केल्या आहेत. त्यासाठी एक मोठा उद्योगपती व भाजपचे ‘वजनदार’ नेते यासाठी चर्चेच्या कामाला लागले असून, त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संपर्क साधून त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. परंतु, ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रचंड राग असून, तेथे चर्चेचे घोडे अडलेले आहे. ठाकरे यांच्याशी पुन्हा चर्चा करता यावी, त्यासाठी एक ‘सॉफ्ट कॉर्नर’ असावा, यासाठीच फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद न देण्याची काळजी भाजप नेतृत्वाने यापूर्वी घेतली होती. आताही एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना भाजपात विलीन करून राज्यातील तिढा सोडविण्यासाठी फडणवीस गटाकडून दिल्लीत प्रयत्न केले जात असताना, त्याला दिल्लीतून प्रतिसाद मिळत नसल्याचेही सांगण्यात आलेले आहे.

जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करून महाविकास आघाडीचे सरकार पाडले होते. आपल्या या कृतीमागे दिल्लीतील ”महाशक्ती” असल्याचे शिंदे सांगत आहेत. त्यांच्या अप्रत्यक्षरित्या बोलण्याचा रोख हा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबतीत असल्याचेही सर्वांच्या लक्षात येते. परंतु, ‘राज्यात भाजपची सत्ता आणता येते, हा ‘प्लॅन’ फडणवीस यांनीच दिल्लीत दिला होता’. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला भाजपकडून फूस देण्यात आली असली तरी, त्यानंतर महाराष्ट्रात ज्या वेगवान राजकीय घडामोडी घडत आहे व जनमत भाजपच्या विरोधात गेले आहे, ते पाहाता, आता भाजप नेतृत्वाने याबाबत अत्यंत सावध पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे, असेही सूत्राने स्पष्ट केले.

आगामी निवडणुका कुणाच्या नेतृत्वात लढायच्यात? आणि भाजपचा पुढील मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत जाहीरपणे वाच्यता करण्यास भाजप नेतृत्व टाळत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील किंवा नाही? याबाबतची कोणतीही खात्री नाही. न्यायालयाचा निकाल हा शिंदे यांच्याविरोधातसुद्धा जाऊ शकतो. तरीही देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी ‘प्रमोट’ करण्याची भूमिका भाजप नेतृत्व घेत नसल्याचे दिसून येत आहे. एकीकडे शिवसेनेचे दोन गट निवडणूक चिन्हासह मूळ शिवसेना ताब्यात घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात झगडत असताना, दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत चर्चेचा मार्गही भाजप नेतृत्वाने स्वीकारला असल्याचे खात्रीशीर सूत्राने सांगितले आहे. ठाकरे यांच्या सोबत संबंध सुधारण्याचे पहिले पाऊल म्हणजे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा लवकरच मंजूर होईल, असेही सूत्राने सांगितले.

महाराष्ट्रात मागील दोन निवडणुकांत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांची अप्रत्यक्ष साथ भाजपला मिळाली होती. आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीमुळे लोकसभा व विधानसभा निवडणुकांत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा फार कमी फरकाने पडल्यात, व तेथे भाजपच्या किंवा शिवसेनेच्या जागा निवडून आल्या होत्या. आता सुरूवातीला एकटे पडलेल्या उद्धव ठाकरेंनी नवीन मित्र जोडण्यास सुरूवात केली असून, महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मानसिक तयारी जवळपास केलेली आहे. ठाकरे हे आंबेडकरांना घेऊन पुढील निवडणुकांना सामोरे जाण्यास तयार असताना, शरद पवार किंवा काँग्रेसने त्यांच्या या प्रयत्नांना महाव्िाकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून अद्यापही सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. या दोन्ही पक्षांना जागावाटपात आंबेडकरांचा मोठा अडसर वाटतो. आपल्याच जागा द्याव्या लागतील व आपल्याला जागा कमी मिळतील, अशी भीती त्यांना वाटते आहे.

शिवाय, पवार-आंबेडकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत असून, आंबेडकरांचे सर्वाधिक राजकीय नुकसान पवार व काँग्रेसने केलेले आहे. त्यामुळे ‘ठाकरे-आंबेडकर आणि भाजप’ असे नवे राजकीय समीकरण महाराष्ट्रात जुळवता येईल का? याचा विचार दिल्लीतील भाजप श्रेष्ठी करत असल्याचेही या सूत्राने सांगितले. त्यामुळे पुढील लोकसभा व विधानसभा निवडणुकांत उद्धव ठाकरे हे भाजपसोबत गेल्यास नवल वाटणार नाही, अशी राजकीय परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता राज्याच्या राजकारणात बळावलेली आहे. आपल्या भूमिकेचा ठाकरे यांना अडसर ठरू नये, यासाठीच प्रकाश आंबेडकर यांनी काल ”आम्ही भाजपसोबतही युती करण्यास तयार आहोत”, असे सूचक विधान केलेले आहे. त्यामुळे भाजपसोबत जी वरिष्ठ पातळीवर ठाकरे यांची गोपनीय चर्चा सुरू आहे, त्यात ठाकरे यांच्या मनावरील मानसिक दडपण दूर झाले असल्याचेही खास सूत्राने स्पष्ट केलेले आहे.
——————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!