मुलं कपडे काढतात, रॅगींग करतात; त्या विद्यार्थ्याने मामाला रडत रडत सांगितली होती आपबिती!
– पाच जणांविरुद्ध गुन्हे दाखल, चौघांना अटक
लोणार (तालुका प्रतिनिधी) – लोणार तालुक्यातील विद्यार्थ्याच्या आत्महत्येचा उलगडा करण्यात लोणार पोलिसांना अखेर यश आले असून, विद्यार्थ्याच्या ऑडिओ क्लिपवरून त्याने रॅगींग व शिक्षकाच्या छळास कंटाळून आत्महत्या केल्याचे उघडकीस आल्यानंतर लोणार पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह वसतीगृह गृहपाल याला अटक केली आहे. याप्रकरणी ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने सर्वप्रथम वृत्त दिले होते.
आत्महत्याग्रस्त विद्यार्थ्याच्या एका ऑडिओ क्लिपमुळे हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पाच जणांवर रॅगिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चौघांना अटक करण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यात रॅगिंगच्या त्रासाला कंटाळून १८ जानेवारीरोजी कैलास गायकवाड नावाच्या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली होती. त्याने आत्महत्या का केली? याचे कारण अस्पष्ट असल्याने पोलिसांनी फक्त आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, काही दिवसांआधी मृत कैलास गायकवाड याने आपल्या मामाशी वस्तीगृहावर विद्यार्थी आपले कपडे काढून रॅगिंग करत आहे. त्याचबरोबर शिक्षकही विनाकारण शिवीगाळ करत असल्याचे सांगितले होते. त्याची ऑडिओ क्लिप आता समोर आली आहे. यातून या विद्यार्थ्याला सोबतचे विद्यार्थी वस्तीगृहावर त्रास देत होते. तसेच त्याचे कपडे काढत होते. त्याचे व्हिडिओ काढत होते. त्याचबरोबर तेथील शिक्षकही विनाकारण त्याला शिवीगाळ करत होते, असे तो आपल्या मामांना रडत रडत सांगताना पाहायला मिळत आहे.
या ऑडिओ क्लिपच्या आधारावर आता पोलिसांनी तब्बल पाच जणांवर रॅगिंगचे गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये तीन विद्यार्थ्यांसह वस्तीगृह गृहपाल आणि एका शिक्षकाचासुद्धा समावेश आहे. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात या संपूर्ण प्रकरणामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी लोणार पोलिसांनी तीन विद्यार्थ्यांसह वसतीगृह गृहपाल याला अटक केली असून, अधिक तपास पोलिस करत आहेत.
—————–