सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – बेकायदा मुरूम व मातीचा उपसा करून त्याची बिनबोभाटपणे वाहतूक करणार्या वाहनांना तलाठी व कर्देहळ्ळी ग्रामस्थांनी रोखले असता, मंडलाधिकार्यांनी मात्र कसे काय सोडले, असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे वाहने सोडून एक प्रकारे मुरूम उपसा करणार्यांना अभय दिले आहे का? या सर्व प्रकाराकडे दक्षिण सोलापूरच्या तहसीलदारांचे मात्र दुर्लक्ष होत असल्याची चर्चा कर्देहळळी ग्रामस्थांमधून निघत आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, कर्देहळ्ळी, शिर्पनहळ्ळी, वडगाव व दर्गनहळ्ळी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुरूमाचा व मातीचा बेकायदा उपसा करून त्याची राजरोसपणे वाहतूक केली जात आहे. यासंदर्भात नागरिकांनी तहसील प्रशासनाकडे तक्रार करूनही त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले गेले. वळसंग पोलीसही याकडे डोळेझाक करीत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या कर्देहळ्ळी ग्रामस्थांनी सोमवारी तलाठी घुगे यांना सोबत घेऊन कुंभारी फाट्यावर सर्व बेकायदा मुरूम व माती वाहतूक करणारी वाहने रोखली. त्यावेळी वाहनांच्या चालकाकडे तलाठ्यांनी चौकशी केली असता, त्यांच्याकडे गौण खनिजच्या बोगस पावत्या आढळून आल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.
याप्रकरणी लगेच गुन्हे दाखल होणे अपेक्षित होते. परंतु मुस्तीचे मंडलाधिकारी मेंगर्ती यांनी वाहनधारकांवर कारवाई करण्याऐवजी उलट तलाठी घुगे व ग्रामस्थांचीच कानउघाडणी करीत रोखून धरलेली वाहने सोडून दिली. या संपूर्ण प्रकाराकडे तहसीलदार अमोल कुंभार यांनीही दुर्लक्ष केले आहे. शासनाचा महसूल बुडविणार्यांवर कारवाई करण्याऐवजी उलट त्यांना अभय देण्याचा प्रकार कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे, अशी चर्चा ग्रामस्थांमधून निघत आहे. दरम्यान या प्रकरणी तहसीलदार कुंभार व मंडलाधिकारी मेंगर्ती यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी कर्देहळ्ळी ग्रामस्थांनी केली आहे.
तलाठी व सर्कल यांची चौकशी करणे गरजेचे आहे. कारण अवैधरित्या उपसा करण्यात येणारा मुरुम पकडला असताना त्याला अभय देण्याचे काम प्रशासनाने केले आहे.
– नागेश शिंदे, सरपंच कर्देहळ्ळी