चिखली/मेहकर (रवींद्र सुरूशे) – चिखली तालुक्यातील सोनेवाडी येथील सुपुत्र रवींद्र पांडुरंग राखुंडे हे भारतीय सैन्यात युनिट ९ गार्डमध्ये नाईक पदावर आपले कर्तव्य बजावत होते. कमांड हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना येथे भरती करण्यात आले हाेते. त्यांच्यावर आज, २५ जानेवारी रोजी आपल्या मूळ गावी सोनेवाडी येथे लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. यावेळी लष्करासह पोलीस अधिकार्यांनी पुष्पचक्र अर्पण करून त्यांना सलामी देत बंदुकीच्या फैरी झाडत अंत्यसंस्कार पार पडले.
रवींद्र पांडुरंग राखोंडे हे सात वर्षांपूर्वी भारतीय सैन्य दलात रुजू झाले होते, त्यांच्या पश्चात पत्नी व एक वर्षाचा मुलगा, चार बहिणी असा मोठा आप्तपरिवार आहे. यावेळी भास्कर पडघान सहाय्यक जिल्हा सैनिक अधिकारी बुलढाणा, संजय गायकवाड अधीक्षक सैनिक कार्यालय बुलढाणा, सुभेदार अशोक शेळके, माजी सैनिक संघटना कोर कमिटी अध्यक्ष, माजी सैनिक गंगाराम चिंचोले, विश्वनाथ पवार माजी सैनिक, सुभेदार एस. आर. मुलानी, नायक जगताप मदन, तहसीलदार डॉक्टर अजित कुमार येळे, किशोर पाटील मंडळ अधिकारी, रामेश्वर हांडे उपविभागीय अधिकारी, भारत काळे गटविकास अधिकारी, ठाणेदार राजवंत आठवले, माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे, आमदार श्वेताताई महाले पाटील यांचे वडील अंकुशराव पडघान, नितीन राजपूत, कपिल खेडेकर, दत्ता खरात, नंदू कराळे, सौ.ज्योतीताई खेडेकर, सरपंच ज्ञानेश्वर गोफने, पोलीस पाटील शिवचरण पवार, माजी सरपंच बाळासाहेब पवार आदी मान्यवर मंडळी यांची उपस्थित होती.
दुचाकीस्वाराने उडविले आणि तब्येतीत निर्माण झाली गुंतागुंत
सोनेवाडी गावचे सुपूत्र रवींद्र पांडुरंग राखोंडे हे पठाणकोट येथे गार्ड रेजिमेंटमध्ये कार्यरत होते. एक महिन्याच्या सुट्टीवर घरी आले होते. दहा दिवसागोदर सुट्टी संपायला दोन दिवस बाकी असतांना, त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला होता. ड्युटीवर जाण्याअगोदर बहिणाला भेटून यावे, यासाठी चांडोळकडे मोटारसायकलने निघाले असता, पिंपळगाव सराई या गावाअगोदर समोरून येणार्या मोटारसायकलने त्यांच्या गाडीला धडक दिली होती, यात ते जखमी झाले होते. सुरुवातीला बुलडाणा येथे उपचार घेऊन पुढील उपचारासाठी कमांड हॉस्पिटल पुणे येथे भरती झाले होते. पायाचे ऑपरेशन करून त्यात रॉडसुद्धा टाकला होता. प्रकृतीत सुधारणासुद्धा होत होती. पण अचानक दोन दिवसापासून तब्येतीत गुंतागुंत निर्माण झाली आणि आज सकाळी ३ ते ४ वाजे दरम्यान त्यांचे दु:खद निधन झाले. जवान रविंद्र राखोंडे हे श्री शिवाजी महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी होते. स्वभाव अतिशय अबोल होता. घरची परिस्थिती खूप गरिबीची होती. २०१३ ते २०१६ असे तीन वर्ष ते एनसीसीमध्ये होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
—————-