अंढेरा पोलिसांच्या नाकावर टिच्चून मेरा खुर्द येथे वरली मटक्याचा अड्डा राजेरोसपणे सुरू!
– अवैद्य धंद्यामुळे मेरा खुर्द फाट्याचे नाव होत आहे बदनाम!
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली-देऊळगावराजा रोजवरील महत्वाचे गाव असलेल्या मेरा खुर्द येथे अवैध वरली मटक्याचा अड्डा खुलेआम सुरू असून, या अवैध धंदेवाल्याला कुणाचा आशीर्वाद आहे? अंढेरा पोलिस व बुलढाणा एलसीबी यांना हा अड्डा दिसत नाही का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ करत आहे. वरली मटक्यात हार-जीत झाली की गर्दुले, दारूडे हे दारू पिऊन मेरा चौकीवर धिंगाणा घालतात. महिला, मुली यांना पाहून अश्लील हावभाव करतात, व अर्वाच्च भाषेत बोलतात. त्यामुळे पोलिसांनी या प्रकाराला तातडीने आळा घालण्याची गरज असून, अन्यथा अनर्थ घडण्याची शक्यताही नाकारता येत नाही. जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी तातडीने अंढेरा पोलिस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या या गैरप्रकार व अवैध धंद्याकडे तातडीने लक्ष द्यावे व हा वरली मटक्याचा अड्डा बंद करावा, अशी मागणी संतप्त ग्रामस्थ करत आहे.
चिखली तालुक्यातील मेरा खुर्द येथे चिखली – देऊळगावराजा रोडवर खुलेआम अवैद्य वरली मटका सुरू असल्याने शहरातील अवैद्यधंद्याचे लोन आता खेडेपाड्यातही पोहोचल्याचे दिसून येत आहे. मेरा खुर्द ग्रामीण भागात येत असल्यामुळे येथील वरली मटक्यामुळे कौटुंबिक कलह व आर्थिक अडचणींना महिलांना सामोरे जावे लागत आहे. मेरा खुर्द हे असे गाव आहे की, भरोसा, देळगाव घुबे, आंचरवाडी, असोला, रामनगर, रोहडा, अंत्री खेडेकर या गावांतील ग्रामस्थांची मेरा फाटा येथे वरदळ असते. तसेच साखरखेर्डा-वरुड या मार्गावरील जर कोणाला जालना येथे किंवा चिखली येथे जायचे असेल तर या फाट्यावरून जावे लागते. त्यामुळे या फाट्यावर लोकांची भरपूर वर्दळ असते. या ठिकाणी वरली मटक्याचे अवैध दुकान मोठ्या थाटामाटात सुरू आहे. सदर दुकान हे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? असा प्रश्न निर्माण होतो. अंढेरा पोलिस व बुलढाणा एलसीबी यांना हे दुकान दिसत नाही का, की त्यांचेही या अवैध धंदेवाल्याला आशीर्वाद आहे? असे संतप्त उदगार ग्रामस्थ काढत आहेत.
याच गावात शासनमान्य देशाचे दारूचे दुकानसुद्धा आहे, वरली मटकामध्ये पैशाचे हार जित झाल्यानंतर काही लोक हे दारू पिऊन मेरा चौकी येथे नशेच्या अवस्थेमध्ये रोडच्या साईडला महिलांना अर्वाच्च भाषेमध्ये बोलताना दिसून येत आहेत. दारूच्या नशेतील लोकांच्या त्रासामुळे मेरा चौकी येथे प्रवाशांनी उभे राहावे की नाही, अशी अवस्था तयार झाली आहे. या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरकडे जाणारेसुद्धा प्रवासी असतात, तसेच मेरा चौकी हे चिखली – देऊळगावराजा रोडवर असल्यामुळे येथे प्रवाशांची भरपूर वर्दळ असते. परंतु अवैद्य धंद्याच्या त्रासामुळे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी अवैद्य धंद्यामुळे या आधीसुद्धा लुटमारीचा प्रकार व दुकान फोडण्याचा प्रकार झालेला आहे. परंतु पोलीस प्रशासन तात्पुरती कारवाई करून संबंधितांना सोडून देतात, त्यामुळे येथे प्रवाशांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे.
सदर मेरा खुर्द हे गाव अंढेरा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येत असल्यामुळे अंढेरा पोलीस स्टेशनचे अधिकारी यांना सदर बाबी या माहिती आहेत. परंतु, तरीही ते दुर्लक्ष करत आहेत. तसेच शाळेतील मुलांचासुद्धा प्रवास या ठिकाणाहून होत असतो. मेरा चौकी येथे भरोसा रोडवर शिवशंकर विद्यालय आहे. त्यामुळे मेरा चौकी येथे विद्यार्थ्यांची खूप वर्दळ असते. त्या ठिकाणी शाळेतील मुलींनासुद्धा या बाबीचा त्रास होत आहे. तेव्हा मेरा खुर्द येथील अवैध वरली मटक्याचा अड्डा तातडीने बंद करावा, अशी मागणी जागृत ग्रामस्थ करत आहेत. तरी या भागातील अवैद्य धंद्याकडे पोलीस पाटील, सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष यांनी लक्ष देण्याची गरज आहे तसेच पोलीस प्रशासनानेसुद्धा या बाबीकडे लक्ष देऊन मेरा चौकी येथे वरली मटका व देशी दारू पिऊन मेरा चौफुलेवर जे लोक शाळेतील मुलांना व महिलांना अर्वाच्च भाषेमध्ये बोलतात त्यांचा बंदोबस्त करावा, अशी जनतेतून मागणी होत आहे.