Breaking newsBULDHANAChikhali

श्री संत मुगसाजी महाराज सूतगिरणीवर जिल्हा बँकेची कारवाई सुरू!

चिखली (एकनाथ माळेकर) – तब्बल २५ कोटींपेक्षा अधिक रकमेचे कर्ज थकविल्याप्रकरणी माजी आमदार राहुलभाऊ बोंद्रे यांच्या चिखली येथील श्री मुंगसाजी महाराज सहकारी सूतगिरणीविरुद्ध जिल्हा सहकारी बँकेने कारवाई सुरू केली आहे. बँकेचे अधिकारी कालपासून चिखलीत ठाण मांडून बसले असून, सूतगिरणीशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेण्याची कार्यवाही सुरू होती. या कारवाईने जिल्ह्यात खळबळ उडाली असून, या कारवाईला राजकीय वळण मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेकडून या सूतगिरणीने २५ कोटींपेक्षा जास्त कर्ज घेतले असल्याची माहिती हाती आली असून, या कारवाईबाबत अधिकृत माहिती देण्यास अधिकारी टाळाटाळ करत होते. तसेच, हे प्रकरण मध्यंतरी न्यायालयातदेखील गेले होते. न्यायालयाच्या आदेशानंतर जिल्हा बँकेकडून सूतगिरणीवर जप्ती कारवाई सुरू करण्यात आली आहे. ही सूतगिरणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या ताब्यात आहे. सूतगिरणीवर जिल्हा बँकेचे २५ कोटीपेक्षा जास्त कर्ज आहे. वारंवार नोटीस बजावून व सूचना देऊनदेखील सूतगिरणीने थकबाकीची रक्कम भरलेली नाही. त्यामुळे न्यायालयीन आदेश घेऊन बँकेचे वसुली पथकातील सुमारे १५ अधिकारी कर्मचारी कालपासून चिखली शहरात असून, सूतगिरणीवर कारवाई सुरू असल्याची माहिती हाती आली आहे. अधिकारी पोहोचताच काल सूतगिरणीच्या संचालक मंडळाने थकित कर्जातील काही रक्कम भरण्याची तयारी दर्शवली आहे. या संदर्भात राहुल बाेंद्रे यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, हाेऊ शकला नाही. संपर्क झाल्यानंतर सूतगिरणीची बाजूही ब्रेकिंग महाराष्ट्र मांडणार आहे.
—————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!