मंगरूळ नवघरे (प्रतिनिधी) – जिजामातांचे धैर्य, कर्तव्याची तीव्र भावना, स्वाभिमान यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली. त्यामुळे जिजाऊ मॉसाहेबांसारखी आदर्श आई पुन्हा होणे नाही, असे प्रतिपादन सावंगी गवळी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक श्री पाटील सर यांनी केले.
सावंगी गवळी येथे १२ जानेवारीरोजी राजमाता जिजाऊंची ४२५ वी जयंती उत्साहात साजरी झाली. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. श्री पाटील सर म्हणाले, की इंग्रजी कॅलेंडरनुसार जिजाऊ मॉसाहेबांचा जन्मदिवस १२ जानेवारीला असतो. तर मराठी दिनदर्शिकेनुसार पौष पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा केला जातो. जिजामातांचे धैर्य, कर्तव्याची तीव्र भावना, स्वाभिमान यामुळे शिवाजी महाराजांना सर्वात महान मराठा शासक आणि योद्धा बनण्याची प्रेरणा मिळाली. राजमाता जिजाऊ या सिंदखेडराजाच्या लखुजी जाधवरावांच्या कन्या होत्या. जिजाऊंच्या आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई असे होते. जिजाऊंना दत्ताजी, अचलोजी, रघुजी आणि महादुजी असे चार भाऊ होते. राजमाता जिजाऊ यांचा विवाह पुण्याच्या शहाजीराजे यांच्याशी झाला होता. शिवाजी महाराज हे पोटात असताना जिजाऊंना अनेक संकटांचा सामना करावा लागला होता. मराठा सम्राज्याच्या संस्थापक, राजमाता जिजाऊ यांनी शिवाजी महाराजांच्या संगोपनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. जिजाऊंना लहानपणापासूनच अन्यायाविषयी चीड होती. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी लहान वयातच तलवार आणि ढाल हाती घेऊन लढण्याचे कौशल्य आत्मसात केले होते, अशी महत्वपूर्ण माहिती पाटील सरांनी दिली.
माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त सृष्टी भागवत शेजोळ, पूनम रामेश्वर शेजोळ, सानिका कडूबा धंदर, दिव्या सचिन भानापुरे यांनी जिजाऊ मातेचा वेश परिधान केला होता. यावेळी त्यांनी जिजाऊ मातेंचा फक्त वेषच नाहीतर त्यांचे गुण अंगिकारू, अशी शपथ घेतली. या कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा परिषद शाळा सावंगी गवळी येथील मुख्याध्यापक सदावर्ते सर, दुकानदार सर, सवडतकर सर, आदी उपस्थित होते. तसेच पवन शेजोळ, शुभम शेजोळ, रवींद्र कापसे, विशाल गवई, गोपाल अंभोरे तसेच समस्त गावकरी मंडळी सावंगी गवळी आणि जिल्हा परिषद सावंगी गवळी शाळेतील बालगोपाल हे उपस्थित होते.
—————-