भाजपाशी युती नाहीच, वंचितने केली भूमिका स्पष्ट.. सन्मानपूर्वक वागणूक मिळाल्यास काँग्रेस, राकाँ., शिवसेनेशी युती शक्य- निलेश जाधव
बुलडाणा- आगामी काळात होवू घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पालिका निवडणुकीमध्ये भाजपाशी युती नाहीच, अशी भुमिका वंचित बहुजन आघाडीने जिल्ह्यात घेतली असून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेकडून सन्मानपुर्वक वागणूक मिळाल्यास त्यांच्यासोबत युतीची शक्यता वंचितचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीला संबोधीत करतांना स्पष्ट केली.
वंचितच्या जिल्हा कार्यालयात आज सोमवार 20 जून रोजी महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये जिल्ह्यात होणाऱ्या नगर पालीका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीचे आयोजन राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय ॲड.बाळासाहेब आंबेडकर, प्रदेशाध्यक्ष रेखाताई ठाकुर व जिल्हाप्रभारी धैर्यवर्धन पुडंकर मार्गदर्शनाखाली करण्यात आली होती. यावेळी नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीमध्ये भाजपा सोडून वंचित कुणासोबतही युती करण्यास तयार आहोत, असे सांगत निलेश जाधव यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने सन्मापूर्वक वागणूक दिल्यास त्यांच्याशी दिलजमाईची संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी यासाठी संबंधित पक्षाच्या जिल्हाअध्यक्षाकडून तसे प्रयत्न होण्याची आशा व्यक्त केली आहे. निलेश जाधव यांच्या मातोश्रीचे 2 जून रोजी निधन झाले होते, प्रथम त्यांना श्रध्दांजली अर्पण करुन बैठकीला सुरुवात करण्यात आली. या बैठकीला वंचितचे जिल्हा महासचिव प्रशांत वाघोदे, बाळा राऊत, भिमराव सिरसाठ, ॲड.अमर इंगळे यांनी सुध्दा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करीत निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या बैठकीला दत्ता राठोड, संदिप लहाने, मिलींद वानखेडे, दिलीप राठोड, संजय धुरंधर, बळी मोरे, विशाल मोरे, विजय दोळे, विजय राऊत, दिलीप राजभोज, भिमराव खराटे, महेन्द्र पन्हाळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युती नेमकी कोणासोबत हे गुलदस्त्यातच..
सन 2019च्या विधानसभा निवडणूकीमध्ये वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार विजयराज शिंदे यांना मिळालेल्या मतांचा विचार केला असता, विजयराज शिंदे हे दुसऱ्या क्रमांकावर होते. वंचित सोबतच्या युतीचा फायदा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेला होवू शकतो. युतीचे निर्णय कदाचीत संबंधित पक्षांचे वरिष्ठ ठरवतील, परंतु वंचित काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिघांपैकी नेमकी युती कोणासोबत करु शकते, हे मात्र वंचितने गुलदस्त्यातच ठेवले आहे, एवढे मात्र निश्चीत !