लोणार (तालुका प्रतिनिधी) – तालुक्यातील हिरडव येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकाची अज्ञात मारेकर्यांनी गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (दि.१) सायंकाळी उघडकीस आली आहे. उत्कर्ष पाटील (वय ३२) असे हत्या झालेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव असून, ते मूळचे मुंबईतील रहिवासी आहेत. तीन आठवड्यापूर्वीच त्यांची हिरडव शाखेच शाखाधिकारी म्हणून बदली झाली होती.
रविवारी सायंकाळी लोणार-मेहकर मार्गावरील सारंगपूर फाट्यावरील उसाच्या शेतात पाटील यांचा मृतदेह आढळून आला. चाकूने त्यांचा गळा चिरलेला तसेच मृतदेहाजवळच चाकू ठेवून अज्ञात मारेकरी फरार झाल्याचे दिसून आले. या खून प्रकरणी मेहकर पोलिस अधिक तपास करत आहेत. उत्कर्ष पाटील यापूर्वी परिविक्षाधीन शाखाधिकारी म्हणून बुलढाणा येथे कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी मुंबईत बदलीदेखील मागितली होती. परंतु, मुंबईत बदली होत नसल्याने त्यांनी सेवेचा राजीनामा एसबीआयकडे सादर केलेला होता. त्यांचा राजीनामा मंजूर होण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जानेफळ, हिरडव येथे बदली देण्यात आली होती. परंतु, त्यांचा इतका निर्घृण खून झाल्याने मेहकर पोलिस सर्वअंगाने तपास करत आहेत.
—————-