विक्रमगड (जि. पालघर) /विजय पटेल
ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत प्रथमच ग्रामीण भागाला प्रतिनिधीत्व मिळाले असून, या निवडणुकीत विक्रमगड तालुक्याचे खाते उघडले गेले आहे. जव्हार-मोखाडा- विक्रमगड सर्वसाधारण मतदारसंघातून विक्रमगडचे प्रशांत भालचंद्र नडगे हे एकूण ३९२ मते घेऊन व व मोखाड्याचे हेमंत बाळकृष्ण लहामगे ५१७ मते घेऊन बहुमतांनी निवडून आले आहेत.
प्राथमिक शिक्षक पतपेढीची ही निवडणूक ठाणे व पालघर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी अत्यंत प्रतिष्ठेची व चुरशीची लढत ठरली होती. आतापर्यंत विक्रमगड तालुक्यातील एकाही उमेदवाराला संचालकपदाची निवडणूक जिंकता आली नव्हती. आता पहिल्यांदाच प्रशांत नडगे व हेमंत लहामगे यांच्या रुपाने तालुक्याचे प्रतिनिधी पतपेढीत गेले आहेत, त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे.
या निवडणुकीमध्ये १० उमेदवार रिंगणात होते. विक्रमगड, जव्हार, मोखाडा असा मतदारसंघ असल्याने सगळीकडे जास्तीत जास्त प्रमाणात मते मिळविण्यासाठी उमेदवारांची प्रयत्नाची शर्थ लागली होती. यामध्ये हेमंत लहामगे व प्रशांत नडगे यांच्या युतीने पहिल्या व दुसर्या क्रमांकाची मते मिळवून विजयी पताका फडकावली. विक्रमगड तालुक्याला पहिल्यांदाच संचालकपद मिळाल्याबद्दल प्रशांत नडगे यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.