खडसेंच्या कार्यकर्त्यांनी टरबूज फोडले!; निकालाआधीच जल्लोष, भाजपच्या गोटात शांतता!
– भाई जगताप, की प्रसाद लाड? पैâसला लवकरच!
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने शक्यता वर्तविल्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाची पाचवी जागाच धोक्यात आली असून, सहाव्या जागेचे उमेदवार प्रसाद लाड यांना सेफ करावे तर उमा खापरे बाद होतात, अशी स्थिती निर्माण झाली आहे. निर्णायक निकाल लवकरच हाती येणार असून, मतमोजणी सुरु आहे. पहिल्या टप्प्यात भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी एक मत बाद झालेले आहे. त्याचा फटका भाजपला तर फायदा महाआघाडीला होणार आहे. निकाल हाती येण्यापूर्वीच एकनाथ खडसे यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला असून, टरबूज फोडून देवेंद्र फडणवीस यांचा निषेध केला गेला. एकीकडे महाआघाडीच्या गोटात आनंदाची लाट असून, भाजपमध्ये मात्र शांतता पसरलेली आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बरोबर पाच वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात कर्करोगाने ग्रस्त असलेले भाजपचे आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप हे पीपीई कीट घालून विधिमंडळात आले. त्यांनी त्यांचे मतदान सहाय्यकामार्फत मतपेटीत टाकल्याने काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. परंतु, तो निवडणूक आयोगाने फेटाळला. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरु होत असल्याने आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, धोक्यात आलेली प्रसाद लाड यांची जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्याक्षणी रणनीती बदलली. त्यामुळे उमा खापरे यांची जागा धोक्यात असल्याचे दिसते.
विधानपरिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे ५ वाजता मतदान पूर्ण झाले. नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार मतदानाला आले. त्यासाठी अजित पवार यांनी स्वतः संपर्क साधून, या आमदारांची नाराजी दूर केली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकणार आहेत. तर काँग्रेसही एक आमदार सहज जिंकून आणणार आहे. खरी लढत भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात होती. शेवटच्याक्षणी फडणवीस यांनी लाड यांना सेफ केल्याचे सांगण्यात आले.
मतमोजणीत राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर व भाजपच्या उमा खापरे यांच्या कोट्यातील प्रत्येकी एक मत बाद झाल्याने भाजपला मोठा धक्का बसला. या निर्णयाविरोधात केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जाणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. रामराजेंना २८ मते असली तरी ते सेफ झोनमध्ये आहेत. महाआघाडीच्या खेम्यात सध्या आनंदाची लाट असून, सचिन अहिर, एकनाथ खडसे, आमशा पडवी यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. आमशा पडवी यांनी तर आमदार झाल्याच्या थाटात खास आदिवासी नृत्य करत सर्वांची मने वेधून घेतली. तर महाआघाडी रडीचा डाव खेळत आहे, अशी टीका भाजप नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केली. फडणवीस यांचा डाव एकनाथ खडसे, अजित पवार व मुख्यमंत्र्यांनी उधळून लावल्याची भावना विधिमंडळात व्यक्त होत होती.
—————-