फडणवीसांनी प्रसाद लाड यांना केले सेफ; मतदान पूर्ण, आता निकालाची प्रतीक्षा!
– अजितदादा, नाथाभाऊ हे फडणवीसांवर मात करणार का?
मुंबई (ब्रेकिंग महाराष्ट्र) – विधानपरिषदेच्या १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात उतरल्याने अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत बरोबर पाच वाजता मतदान प्रक्रिया पार पडली. या मतदानात कर्करोगाने ग्रस्त असलेले भाजपचे आमदार मुक्ता टिळक व लक्ष्मण जगताप हे पीपीई कीट घालून विधिमंडळात आले. त्यांनी त्यांचे मतदान सहाय्यकामार्फत मतपेटीत टाकल्याने काँग्रेसने आक्षेप नोंदवला होता. परंतु, तो निवडणूक आयोगाने फेटाळला. त्यानंतर मतमोजणीची प्रक्रिया सुरु होत असल्याने आता निकालाची प्रतीक्षा लागली आहे. दरम्यान, धोक्यात आलेली प्रसाद लाड यांची जागा जिंकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी शेवटच्याक्षणी रणनीती बदलली. त्यामुळे उमा खापरे यांची जागा धोक्यात असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानपरिषदेच्या १० जागांच्या निवडणुकीसाठी २८५ आमदारांचे ५ वाजता मतदान पूर्ण झाले. नाराज असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे तीनही आमदार मतदानाला आले. त्यासाठी अजित पवार यांनी स्वतः संपर्क साधून, या आमदारांची नाराजी दूर केली. दुसरीकडे, राष्ट्रवादीचे आमदार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना अंतरिम आदेश देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. त्यामुळे अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना मतदान करता आले नाही. काँग्रेसकडून चंद्रकांत हांडोरे आणि भाई जगताप हे दोन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे संख्याबळ पाहता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येकी दोन उमेदवार सहज जिंकून आणू शकतात. तर काँग्रेसही एक आमदार सहज जिंकून आणू शकतो. भाई जगताप यांची जागा धोक्यात आहे. सद्या निवडणूक आयोगाची बैठक सुरु असून, त्यानंतर मतमोजणी सुरु होणार आहे. त्यामुळे थोड्याच वेळात निकाल हाती येऊ शकतो, किंवा रात्री उशीरही होऊ शकतो.