बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – चिखली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांची बुलढाणा येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिस निरीक्षकपदी बदली झाली आहे. ‘एलसीबी’चे पीआय होण्यासाठी अनेकांनी जोरदार ‘फिल्डिंग’ लावली होती. परंतु, पोलिस अधीक्षकांनी ‘कामगिरी व डिटेक्शन्स’च्या निकषावर पात्र ठरलेल्या अशोक लांडे यांना ‘एलसीबी’ची जबाबदारी दिली आहे. आज त्यांनी गुन्हेशाखेचा पदभार पोलिस निरीक्षक बळीराम गिते यांच्याकडून स्वीकारला.
पोलिस दलात सर्वोत्तम गुन्हे तपास व उकल नावावर असलेल्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नावावर जिल्हा पोलिस अधीक्षक सारंग आवाड यांनी शिक्कामोर्तब केल्यानंतर आता ‘एलसीबी’मध्ये अमुलाग्र बदल होतील, अशी आशा आहे. ‘एलसीबी’ फक्त नेहमीच चर्चेत राहत असलेल्या ‘वसुली’पुरती मर्यादीत न राहाता, ती गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरेल, व गुन्ह्यांची उकल होऊन गुन्हेगार गजाआड होतील, अशी आशा अशोक लांडे यांच्या नियुक्तीने पल्लवीत झालेली आहे.
पोलिस अधीक्षकांनी आज (दि.३०) जिल्ह्यातील तीन पोलीस निरीक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये कल्याण शाखेचे दिनेश झांबरे यांची बदली जळगाव जामोद ठाणेदारपदी, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख बळीराम गीते यांची बोराखेडी ठाणेदारपदी तर चिखलीचे ठाणेदार अशोक लांडे यांच्यावर स्थानिक गुन्हे शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे. एलसीबीप्रमुख हा जिल्हा पोलिस अधीक्षकांसाठी अत्यंत महत्वाचा असतो. अनेक जटील गुन्ह्यांची उकल, गुन्हेगारांवर वचक व लक्ष्य ठेवण्यासह जिल्हाभरातील गुन्हेविषयक हालचालींवर एलसीबीचे लक्ष असते. काही विशेष अधिकारदेखील एलसीबीप्रमुखांना प्रदान असतात. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांनी अनेक क्लिष्ट व किचकट गुन्ह्यांची उकल केली असून, कामगिरी व डिटेक्शनच्या निकषावर ते एलसीबीप्रमुख पदासाठी पात्र ठरले आहेत. चिखलीत ठाणेदार म्हणून येण्यापूर्वी ते अमरावती येथे शहर वाहतूक शाखेत होते. कायदा व सुव्यवस्था राखण्यासह गुन्हेगारांचा बिमोड करण्यात ते यशस्वी होतील, अशा शुभेच्छा सर्वांनी त्यांना दिलेल्या आहेत.
—————-