वाघाळा (योगेश काकड) – ग्रामपंचायत बिनविरोध झाली की, गावात राजकारणाचा विषय उरत नाही. आणि सर्व गाव एकजूट असेल तर गावाचा विकास झाल्याशिवाय राहात नाही, असे ठाम मत आदर्शगाव पाटोदा (जि. औरंगाबाद) चे माजी सरपंच व प्रसिद्ध ग्रामीण व्याख्याते भास्करराव पेरे पाटील यांनी व्यक्त केले. वाघाळा येथे त्यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी मोठ्या संख्येने पंचक्रोशीतील ग्रामस्थांची उपस्थिती होती.
पेरे पाटील म्हणाले, की माझ्या गावात एकसुद्धा दगड नाही. मी माझ्या गावाचा सरपंच राहिले, गावातील प्रत्येकाला शुद्ध पाणी, फुकट पीठ दळून देत होतो. गावाचा विकास झाला तर मलाही समाधान वाटले. तसं गाव एकजुटीने राहिले तर गावाचा निश्चितच विकास होतो. मी साधा माणूस आहे, मी लोकांच्या शेतात कामं केलीत, हॉटेलवर काम केले. गावाने सरपंच केलं तेव्हा सर्वांचे दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला. गावागावाचं राजकारणच विकासाला आडवं येतं. म्हणून ग्रामपंचायत बिनविरोध झाली पाहिजेत. सर्वांनी एकजुटीने गावाच्या विकासासाठी झगडलं पाहिजे, असे पेरे पाटील यांनी सांगून, अस्सल ग्रामीण भाषेत ग्रामस्थांचे प्रबोधन केले.
हे व्याख्यान ऐकण्यासाठी वाघाळा गावासह झोटिंगा, मलकापूर पांग्रासह पंचक्रोशीतील गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच, अशोक वाघ, खरात सर, प्रवीण गिते, सुनील जायभाये, अल्ताफ शेख, सोपान केदार, संजय घुगे, राजू वायाळ, किरण पांगारकर यांच्यासह अनेक मान्यवरांचीही याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थिती होती.
——————-