– राष्ट्र प्रथम – अंत्यविधीनंतर लगेचच नियोजित कार्यक्रमांना हजेरी
गांधीनगर (विशेष प्रतिनिधी) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्री हीराबा यांचे शुक्रवारी रात्री साडेतीन वाजता वृद्धपकाळाने निधन झाले. मृत्युसमयी त्या १०० वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारीदेखील होत्या. आईच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह त्यांच्या भावडांवर दुःखाचा डोंगर कोसळला. स्वतः नरेंद्र मोदी यांनी आईच्या पार्थिवाला खांदा देत, त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार केले. आईच्या निधनानंतरदेखील पंतप्रधान मोदी यांनी आपले नियोजित कार्यक्रम रद्द केले नाहीत. अंत्यसंस्कारानंतर ते अहमदाबाद येथील राजभवन येथे पोहोचून बंगालमध्ये आयोजित राष्ट्रीय गंगा परिषदेला व्हर्चुअली हजेरी लावली व संबोधित केले. तसेच, हावडा ते जलपाईगुडीला जोडणार्या वंदे भारत योजनेची सुरुवातदेखील केली. दरम्यान, साेनिया गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह सर्व राजकीय पक्षांनी आदरांजली अर्पण करत, पंतप्रधान माेदींसह माेदी भावडांचे सांत्वन केले.
गांधी नगरच्या रायसन गावातील पंकज मोदी यांच्या निवासस्थानाहून हीराबा यांची अंत्ययात्रा निघाली. रुग्णवाहिकेपर्यंत पार्थिव नेताना मोदींनीच पार्थिवाला खांदा दिला. पंतप्रधान मोदींच्या मातोश्रींच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी रुग्णालयाबाहेर तसेच घरीदेखील मोठी गर्दी झाली होती. अंत्ययात्रेत ते आईच्या पार्थिव देहाजवळ शोकमग्न अवस्थेत बसून असल्याचे दिसून आले. सेक्टर-३० मधील अमरधाममध्ये अंत्यसंस्कार पार पडले. नरेंद्र मोदी यांनी आईला मुखाग्नि दिला.
हीराबा मोदी यांना मंगळवारी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना यूएन मेहता हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु, शुक्रवारी साडेतीन वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. आईच्या निधनाची बातमी स्वतः पंतप्रधान मोदी यांनी ट्वीटरद्वारे देत, शोक व्यक्त केला होता. त्यानंतर आज सकाळीच साडेसात वाजता ते नवी दिल्लीतून अहमदाबादला पोहोचले. गांधीनगर येथील बंधु पंकज मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचत, त्यांनी आईचे अंत्यदर्शन घेतले व स्वतःच्या हाताने हिंदुरितीरिवाजाप्रमाणे सर्व अंत्यविधी केले. आईच्या पार्थिवाला खांदा देत, शेवटी मुखाग्निदेखील नरेंद्र मोदी यांनीच दिला. अंत्ययात्रेच्या प्रवासात ते आईच्या पार्थिवाजवळ बसून होते.
आईमध्ये नेहमीच त्रिमूर्तीचा भास व्हायचा : नरेंद्र मोदी
तत्पूर्वी, पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन आई हीराबा यांच्या निधनाची माहिती दिली आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली. आईमध्ये नेहमीच एका त्रिमूर्तीचा भास व्हायचा, असे मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले. हीराबा यांचा हातामध्ये दिवा घेऊन असलेला फोटो शेअर करत, ‘आईमध्ये मी कायमच त्या त्रिमूर्तिचा अनुभव घेतला, ज्यात एक तपस्व्याची यात्रा, निष्काम कर्मयोग्याचं प्रतीक आणि मूल्य दिसून आली,’ असे मोदी म्हणाले आहेत.
——————