कर्जतमधील ‘हॉटेल तान्हाजी’ हल्लाप्रकरणी ६ आरोपींच्या मुसक्या आवळल्या!
कर्जत (तालुका प्रतिनिधी) – कर्जत शहरातील कुळधरण रस्त्यावर गुंडवस्ती येथे असलेल्या हॉटेल तान्हाजीवर काही लोकांनी जेवण करून जेवणाचे बिल देण्यास नकार देत, हॉटेलमधील सामानाची मोडतोड करून हॉटेल चालकांना मारहाण करण्यात आली. याच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्यावतीने आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी कर्जत बंद पुकारण्यात आला होता.
सविस्तर असे, की दि.२४ डिसेंबररोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास हॉटेल तान्हाजी येथे प्रकाश चंद्रकांत कांबळे (रा. सिद्धार्थनगर, कर्जत) व त्यासोबत अन्य दोघे जेवण करण्यासाठी आले असता, त्यांनी जेवणानंतर पैसे देण्यास नकार देत, शिवीगाळ व दमदाटी करून बिल देण्यास नकार दिला. ‘बिल द्यावे लागेल’ असे म्हणल्यावर त्यांनी मोठ्याने आरडा-ओरडा करून जास्त त्रास देण्यास सुरुवात केली. आरोपी प्रकाश कांबळे याने इतर आरोपींना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर प्रकाश चंद्रकांत कांबळे, सोहम किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) सर्व (रा.कर्जत) व इतर २५ ते ३० लोकांनी ओमीनी व्हॅन व मोटरसायकलवर येऊन काठ्या-गज असे साहित्य घेऊन आले व त्यांनी मारहाण करतानाच हॉटेल मधील प्रिâज, टिव्हीसह टेबल खुर्च्याची, काउंटर, किचन सामान, पार्टीशन रूमची मोडतोड केली. आरोपींनी हॉटेलमध्ये येऊन फिर्यादीस काठीने व गजाने तोंडावर, खांद्यावर,पाठीवर मारहाण करून हात व गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी फिर्यादीचे हॉटेल व्यावसायिक सहकारी महेंद्र लालासाहेब बागल कामगार फारूक शेख हे मध्ये आले असता त्यांनाही सात ते आठ लोकांनी मारहाण केली.
या घटनेनंतर सकल मराठा समाजाच्यावतीने प्रमुख समन्वयक वैभव लाळगे यांनी आरोपींना अटक करेपर्यंत कर्जत बंदची हाक दिली व दिवसभर कर्जत शहर कडकडीत बंद राहिले. कर्जत पोलिसांनी या घटनेनंतर तात्काळ घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासले, हॉटेल चालक पंडित युवराज निंबाळकर (रा.नांदगाव ता. कर्जत) यांनी फिर्यादी दिली. पोलिसांनी फिर्यादी व साक्षीदार यांना विचारपूस करून आरोपी निष्पन्न करत मुख्य आरोपी प्रकाश चंद्रकांत कांबळे, सह सोहन किसन कदम, करण बाळासाहेब थोरात, सागर उर्फ आनंद गौतम समुद्र, रोहन किसन कदम, मनोज विजय माने सर्व (रा. कर्जत) या सहा आरोपींना जेरबंद केले आहे. इतर आरोपींची नावे निष्पन्न करून कायदेशीर कारवाई सुरू आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित करत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश गावित, आनंद सालगुडे, पोलीस जवान, श्याम जाधव, गोवर्धन कदम, शाहूराज तिकटे, महादेव कोहक, पांडुरंग भांडवलकर, प्रवीण अंधारे, सलीम शेख, सचिन वारे, बळीराम काकडे यांनी केली.
——————