चिखली तालुक्यात युरिया खताची साठेबाजी; कृत्रिम तुटवडा निर्माण करून शेतकर्यांची आर्थिक लूट!
– कृषी विभागाचे अधिकारी झोपले, शेतकरीवर्गात संतापाची लाट!
चिखली (एकनाथ माळेकर) – चिखली तालुक्यात ऐन रब्बी हंगामात पिकांना खते देण्याची वेळ आली असता, व्यापार्यांनी साठेबाजी करून युरिया खतांचा कृत्रिम तुटवडा निर्माण केला असून, या गंभीर बाबीकडे कृषी विभाग कानाडोळा करत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र संतापाची लाट निर्माण झालेली आहे. कृषी निविष्ठा केंद्रे व कृषी सेवा केंद्रात युरियाची गोणी मागितली असता, खत संपले म्हणून सांगितले जाते. परंतु, जादा पैसे देण्याची तयारी दाखवली तर गुपचूप युरिया खताची गोणी मिळते, असा प्रकार सर्रास घडत असून, कृषी विभागाने तातडीने छापेमारी करून साठेबाजी करणार्यांवर कठोर कारवाई करण्याची गरज निर्माण झालेली आहे.
चिखली तालुक्यात १४५ गावे येतात. तसेच, अनेक परवानाधारक कृषी सेवा केंद्र व कृषी निविष्ठा केंद्रे आहेत. त्यांच्यावर तालुका कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाचे थेट नियंत्रण असते. परंतु बर्याच कृषी सेवा केंद्रावर युरिया खत घेण्यासाठी शेतकरी गेला असता, शेतकर्याला सुरुवातीला युरिया खत नाही, असे म्हणून सांगितले जाते. परंतु थोड्या वेळाने तीनशे रुपये द्या, युरिया मिळेल, परंतु बिल देण्यात येणार नाही, असे सांगण्यात येते. या धक्कादायक प्रकाराबाबत चिखली तालुका कृषी अधिकारी यांना फोन केला असता, त्यांनी चिखली तालुक्यामध्ये युरिया खत भरपूर प्रमाणात आहे असे स्पष्ट केले. याचा अर्थ विक्रेते व व्यापारी साठेबाजी करत असल्याचे स्पष्ट होत आहे.
आज शेतकरी आर्थिक संकटात असताना शेतीमालाला भाव नाही, आणि शेतामध्ये आज गहू, हरभरा, पीक असल्यामुळे त्याला युरिया खताची आवश्यकता आहे. परंतु चिखली तालुक्यात विक्रेते व व्यापारी यांनी शेतकर्यांची आर्थिक लूट चालवली असून, साठेबाजी करून कायदादेखील धाब्यावर बसवत आहेत. या सर्व विक्रेते व व्यापार्यांवर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली असून, कृषी विभागाच्या देखरेखीखाली खतांचे वितरण होणे गरजेचे आहे. तालुक्यामधील अनेक कृषी सेवा केंद्रावर युरिया खत उपलब्ध नसल्याचे सुरूवातीला सांगितले जात असले तरी, ज्याच्याकडे खत आहे तो वाढीव भावाने व बिल न देता विकत आहे, याबाबत शेतकर्यांनी कोणाकडे तक्रार करावी, असे फलकसुद्धा कोणत्याही कृषी केंद्रावर ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने पाहणी केली असता दिसून आले नाही. या खत विक्रेत्यांशी कृषी विभागाच्या अधिकार्यांचेही काही साटेलोटे आहे का, असा प्रश्न निर्माण झालेला आहे. शेतकर्याला जर तक्रार करायची असेल तर कोणाकडे करावी, याची माहितीसुद्धा कृषी सेवा केंद्रावर दिसून येत नाही.
सद्या रब्बी हंगामातील पिकांना युरिया खत मिळाले नाही तर त्यांच्या उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे आधीच खरीप हंगामात मोठी झळ सोसलेल्या शेतकर्यांवर विक्रेते व व्यापारी यांनी साठेबाजी करून मोठे संकट लादलेले आहे. युरिया खत उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही कृषी विभागाची आहे. कुणी विक्रेता जर साठेबाजी करत असेल तर त्याच्यावर छापा घालून हा विभाग ते खत जप्त करू शकतो, तसेच जीवनावश्यक वस्तू कायद्यासह इतर कठोर कायद्याप्रमाणे त्या विक्रेत्यावर गुन्हे दाखल करून त्याचा परवानादेखील कायमचा निलंबीत करू शकतो, परंतु कृषी अधिकारी यांनी हेतुपुरस्सर कानाडोळा चालविला आहे का? त्यांची काही तोडपाणी झाली आहे का? असे सवाल त्यांच्या निष्क्रियतेमुळे निर्माण झालेले आहेत.
वास्तविक पाहाता, सरकारने युरिया खताची किंमत ही २६५ रुपये ठरवून दिली असतानासुद्धा काही दुकानांमध्ये ३०० ते ३२० रुपयांनी शेतकर्यांना गंडवण्यात येत आहे. चिखली तालुका कृषी अधिकारी यांनी चिखली तालुक्यातील शेतकर्यांच्या मागणीनुसार पुरवठा करावा व जादा भावाने विक्री करणार्या कृषी सेवा केंद्रावर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरीवर्ग करत आहे. अन्यथा, त्यांच्या संयमाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
———–